प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी पोलिसांनी राजुर कॉलरी परिसरात सुरु असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर धडक कार्यवाही केली. दोन्ही मटका अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी मटका पट्टी फाडणाऱ्या दोन मटका बहाद्दरांना अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांवर धाडसत्र अवलंबले असून राजूर कॉलरी येथे राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या मटका अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी अवैध धंद्यांबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वणी पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कंबर कसल्याचे पोलिसांच्या या धडक कार्यवाही वरून दिसून येत आहे. अवैध धंद्यांबाबत कुणाशी कुठलीही तडजोड न करता किंवा मटका अड्डा कुणाचा आहे, याची जराही पर्वा न करता पोलिस मटका अड्ड्यांवर बेधडक कार्यवाही करीत आहेत. या दोन मटका अड्ड्यांवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी मटका पट्टी फाडणाऱ्यांसह मटका अड्डा चालविणाऱ्या मालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी पोहवा अविनाश चिकराम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, राजुर कॉलरी वार्ड क्र. 3 येथे सार्वजनिक ठिकाणी मटका खेळवला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी रायपुरे यांच्या घराजवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. तेथे शैलेश भगवान मेश्राम (५०) हा लोकांना मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या देऊन पैसे घेताना रंगेहात सापडला. त्याच्या जवळून पोलिसांनी मटक्याचे आकडे लिहिण्याकरिता वापरण्यात येणारे पावती बुक, डॉट पेन, कार्बन तुकडा व रोख १५२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मटका पट्टी फाडतांना रंगेहात सापडलेल्या शैलेश मेश्राम याच्यासह मटका अड्डा चालविणाऱ्या मालकावरही मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मटका जुगारावरील दुसरी कार्यवाही शितला माता मंदिराजवळ करण्यात आली. शितला माता मंदिराजवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एका मटका बहाद्दराला अटक केली. दयाराम फत्ते यादव (५०) हा वरळी मटका खेळवताना पोलिसांना रंगेहात सापडला. त्याच्या जवळून पोलिसांनी मटका जुगार खेळण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य व रोख २०५० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या दयाराम यादव या आरोपीसह मटका मालकावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मटका अड्ड्यांवरील दोन्ही छाप्यात पोलिसांनी एकूण ३,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार मट्केबहाद्दरांवर गुन्हा दाखल केला आहे. मटका अड्डे चालविणाऱ्यांवर अनेक वेळा गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कार्यवाही होतांना दिसत नाही. आज मटका अड्ड्यावर धाड पडली की उद्या त्याच ठिकाणी मटका अड्डा जैसे थे सुरु होतो. त्यामुळे मटका अड्ड्यांवर केवळ थातुर मातुर कार्यवाही केली जात असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.
पोलिसांची मटका अड्ड्यांवरील कार्यवाही नेहमी संशयाच्या भोवऱ्यात असते. मटक्यावरील कार्यवाही कुणीही गांभीर्याने घेतांना दिसत नाही. त्यामुळे कार्यवाही केल्यानंतर त्याठिकाणी परत मटका अड्डा सुरु होणार नाही, याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असते. मात्र नंतर पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. त्यामुळे पोलिस केवळ टार्गेट पूर्ण करण्याकरिता मटका अड्ड्यांवर कार्यवाही करतात, अशी जनतेची धारणा झाली आहे. एवढेच नाही तर नागरिकांमधून तशी खुली चर्चाही ऐकायला मिळते.
असे असले तरी या धाडसी कारवाईमुळे राजुर कॉलरी परिसरातील अवैध मटका अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या कार्यवाहीमुळे राजूर कॉलरी परिसरातील अवैध धंद्यांना काही प्रमाणात का होईना चाप बसणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वणी पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.
No comments: