महात्मा फुले अभ्यासिकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा, स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार –दर्जेदार शिक्षणाचा संकल्प : संजय खाडे
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरातील महात्मा फुले अभ्यासिका केंद्राचा प्रथम वर्धापन दिन सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या ९ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासिकेचे संचालक संजय खाडे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाहतूक उपशाखा वणीचे सपोनि विजय महाले उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत गोहोकार, पुरुषोत्तम आवारी, दिलीप मालेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
१४ ऑगस्ट २०२४ रोजी संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे फाउंडेशनच्या पुढाकारातून वणीत महात्मा फुले अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली. आज या अभ्यासिकेत १८० विद्यार्थी नियमीतपणे अभ्यास करीत असून, पहिल्याच वर्षात ९ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. महात्मा फुले यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या अभ्यासिकेला एक वर्षाची यशस्वी वाटचाल लाभल्याने अभ्यासिकेचा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
🎓 “दर्जेदार शिक्षण देणे हाच संकल्प” – संजय खाडे
अध्यक्षीय भाषणात संजय खाडे म्हणाले, “ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुणे-मुंबईला जाऊन मोठा खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी वणीतच अद्यावत अभ्यासिका उभारली आहे. दर्जेदार शिक्षण मिळावे आणि येथूनच विद्यार्थी मोठ्या पदांवर जावेत हा माझा संकल्प आहे. विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास त्या नक्की सोडवल्या जातील.”
🗣️ “परीश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास यश निश्चित” – विजय महाले
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय विजय महाले म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमधील क्षमता ओळखून, संयम व परिश्रमाने अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते.”
📌 प्रयत्नांची यशस्वी फलश्रुती
प्रा. वैभव ठाकरे यांनी अभ्यासिका सुरु करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि अभ्यासिका सुरु करण्याबाबतची आपली भूमिका मांडली. “अनेक प्रयत्न करूनही अभ्यासिका सुरू होत नव्हती, मात्र संजय खाडे यांनी हा प्रश्न तातडीने सोडवला आणि आज विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार अभ्यास केंद्र उपलब्ध झाले,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. श्वेता दोडके यांनी केले, तर आभार सूरज जूनगरी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने झाली.
No comments: