Latest News

Latest News
Loading...

दोन युवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले, आणि एकाने दुसऱ्यावर वजनी वस्तूने वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी :- 

वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील दोन युवकांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्यावर दगडासारख्या जड वस्तूने हल्ला चढविला. जड वस्तूने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही व्ह्रदयाचा थरकाम उडविणारी घटना बुधवार २० ऑगस्टला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास निर्गुडा नदीच्या गणेशपूर पुलाजवळील मोक्षधाम जवळ घडली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. वादातून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मारहाण करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजय प्रभाकर कावरे वय अंदाजे ४५ वर्षे असे या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर संदिप सूर्यभान इसापुरे वय अंदाजे ३७ वर्षे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येते.

गणेशपूर या गावात राहणाऱ्या संजय कावरे व संदिप इसापुरे यांच्यात कुठल्या तरी कारणावरून टोकाचा वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. संदिप इसापूरे याने संजय कावरे या युवकावर दगडासारख्या वजनी वस्तूने हल्ला चढविला. त्याच्या डोक्यावर वजनी वस्तूने प्रहार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मारहाणीत संदिप इसापुरे हा किरकोळ जखमी झाला आहे. संदिपने जड वस्तूने डोक्यावर वार केल्यानंतर संजय कावरे हा जवळपास अर्धा तास घटनास्थळीच पडून राहिला. जीव जाईपर्यंत दगडासारख्या वजनी वस्तूने डोक्यावर वार करणारा संदिप इसापुरे हा प्रचंड दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. 

एकाच गावातील आणि एकमेकांच्या परिचयाचे असलेल्या या दोन युवकांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि जीव घेण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला, याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. संदिपने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजयचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तर या दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत किरकोळ जखमी झालेल्या संदिपवर उपचार करून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. संजय हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तर संजयला एक १० वर्षाची मुलगी असल्याचे सांगण्यात येते. मृतकाचे वडील पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्याकरिता गेल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांत गुन्हे नोंद होण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

No comments:

Powered by Blogger.