Latest News

Latest News
Loading...

भालर रोडवर एमआयडीसी परिसरात आढळला मानवी हाडांचा सापळा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी भालर मार्गावरील एमआयडीसी परिसरालगत जंगल भागात मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. हातांची हाडे, कवटी आणि उर्वरित हाडांचा सापळा वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला होता. हा हाडांचा सांगाडा मनुष्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु हा हाडांचा सापळा पुरुषाचा की महिलेचा हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याठिकाणी साडी आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. जंगल शिवारात मानवी हाडांचा सांगाडा आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मानवी हाडांचा सापळा उत्तरीय तपासणी करीता पाठविला.

वणी पोलिस स्टेशन हद्दीत एका पाठोपाठ एक गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी मंदर मार्गावरील गौरी ले-आऊट परिसरात मांडवकर बियरबारच्या मागे एक इसम मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर असलेल्या जखमांवरून त्याचा खून झाल्याचा पोलिसांकडून अंदाज बांधण्यात आला. ही घटना ताजी असतांनाच बुधवार २० ऑगस्टला शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकावर दगडाने हल्ला चढवून त्याचा जीव घेतला. दरम्यान २० ऑगस्टलाच दुपारी भालर मार्गावरील हनुमान मंदिराजवळ जंगल भागात मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या मानवी सापळ्याचं रहस्य अद्याप कायम असून ही खून, आत्महत्या की जमिनीत पुरलेल्या मृतदेहाचे हे अवशेष आहेत, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

मागील तीन दिवसांत दोन खुनाच्या व एक मानवी सापळा आढळल्याची घटना उघडकीस आल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. पोलिस व कायद्याचा जराही धाक न उरल्याने शुल्लक कारणावरून खून कारण्यापर्यंतच्या हिंमती वाढल्या आहेत. अपराधीक मानसिकता वाढत चालल्याने गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढले आहे. वणी सारख्या शांतताप्रिय तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मांडवकर बियरबारच्या मागे मृतावस्थेत आढळलेल्या देवराव गुंजेकर यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडलेले नसतांना शहरालगतच मानवी हाडांचा सापळा आढळल्याची रहस्यमय घटना उघडकीस आल्याने पोलिसांसमोर या गंभीर घटनांचा तपास करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.