प्रशांत चंदनखेडे वणी :-
उभ्या ट्रकवर मागून दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २१ ऑगस्टला सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ घडली. भास्कर कुमरे वय अंदाजे ४० वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोवत्ती अभियान (उमेद) या संस्थेच्या वणी विभागात कार्यरत असलेला हा युवक आपले कर्तव्य आटपून मोटारसायकलने (MH २९ BB ४४४९) वरोराकडे जात असतांना सावर्ला गावाजवळ मुख्य मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटारसायकलची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मुख्य मार्गावर बेजबाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे अपघाताच्या घटना प्रचंड वाढल्या असून अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत.
भास्कर कुमरे हा युवक मूळचा राळेगाव तालुक्यातील कोपरी या गावचा रहिवाशी होता. तो वणी पंचायत समितीशी संलग्न असलेल्या उमेद या संस्थेत बीएम (ब्लॉक मॅनेजर) या पदावर कार्यरत होता. त्याची राळेगाव वरून वणी येथे बदली झाल्याने तो वरोरा येथे आपल्या सासरी राहत होता. वरोरा वरून वणी येथे तो रोज मोटारसायकलने जाणे येणे करायचा. आज तो आपले कर्तव्य आटपून वरोऱ्याला जात असतांना सावर्ला गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून त्याची दुचाकी धडकली. यात त्याच्या चेहऱ्याला व डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: