प्रशांत चंदनखेडे वणी :-
सण म्हणजे आनंद, परंपरा म्हणजे संस्कृती आणि त्याला जोडलेली स्पर्धा म्हणजे उत्साह! असाच उत्साह अनुभवायला वणी शहर सज्ज होत आहे. शनिवार २३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे भाजप वणी शहरतर्फे आयोजित करण्यात आलेली तान्हा पोळा सजावट स्पर्धा वणीकरांच्या साक्षीने रंगणार आहे.
लहानग्या गोंडस मुलांचे पारंपरिक वेशभूषेतले आगळेवेगळे थाट, सजवलेल्या बैलांच्या प्रतिकृती, त्यांच्या कल्पक मांडण्या आणि निरागस हसरे चेहरे… हे लोभसवाणे दृश्य या स्पर्धेच्या रूपाने पाहायला मिळणार असून या कलात्मक देखाव्यांमुळे तान्हा पोळ्याचा उत्सव अधिकच देखणा होणार आहे.
स्पर्धेची खासियत म्हणजे ती पूर्णतः निःशुल्क असून, दोन गटांमध्ये पार पडणार आहे. ‘अ’ गटात एक ते पाच वर्षे वयोगटातील बालस्पर्धकांना प्रथम बक्षीस ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये व तृतीय २,००० रुपये असे आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत. ‘ब’ गटात पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठीही याच धर्तीवर बक्षिसांची तरतूद आहे. याशिवाय, प्रोत्साहनपर बक्षिसे आणि प्रत्येक सहभागीला आकर्षक भेटवस्तू देऊन लहानग्यांचा उत्साह दुणावला जाणार आहे.
भाजपचे मुख्य संयोजक रवी बेलूरकर, शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, संयोजक आशिष डंभारे तसेच विलास डवरे, नितीन बिहारी आणि राजेंद्र जयस्वाल या आयोजकांनी केलेल्या आवाहनामुळे आधीच अनेक पालकांनी सहभागाची तयारी दाखवली आहे.
तान्हा पोळा सणाचा आनंद आणि पारंपरिक वेषभूषेतल्या बैल सजावटीच्या कल्पक सादरीकरणामुळे या स्पर्धेचे आकर्षण उत्तरोत्तर वाढू लागले आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा राहिली नसून परंपरेची जतन करणारा हा एक उपक्रम झाला आहे. गोडुल्या लेकरांच्या निरागसतेतून आणि त्यांच्या सर्जनशीलतेतून तान्हा पोळ्याचा लळा वणीकरांच्या मनात अधिक गडद होणार आहे.
No comments: