Latest News

Latest News
Loading...

वणी येथे जागतिक माहिती अधिकार दिन साजरा – डॉ. विजय दिघे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

माहिती अधिकार कायद्याच्या जनजागृतीसाठी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या आरटीआय क्लबच्या वतीने शहरातील श्री रंगनाथ स्वामी मंदिर प्रांगणात जागतिक माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.के. टोंगे हे होते. तर प्रशांत जुमनाके, अविनाश बुधकोंडावार, दिनकर पारखी, जलील शेख, बापूराव गेडाम, योगेश तेजे, बबन काकडे आदी आरटीआय पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी आरटीआय क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय दिघे यांनी थेट लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले की, “ दादाजी पोटे सारखे हजारो कार्यकर्ते समाजात घडले पाहिजेत”. त्यांच्या या शब्दांवर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला.

दादाजी पोटे यांच्या नेतृत्वाखाली २००९ पासून वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या भागात आरटीआय क्लबची प्रभावी शाखा कार्यरत असून, नागरिकांना पारदर्शक व जबाबदार प्रशासनाची जाणीव करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा लोकाभिमुख कायदा देशभर १२ ऑक्टोबर २००५ पासून लागू झाला. शासनाच्या प्रयत्नांमुळे या कायद्याला राज्यात लवकरच व्यापक प्रतिसाद मिळाला असून, त्याची जाणीव समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुषंगाने वणी येथेही जागतिक माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

No comments:

Powered by Blogger.