प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर भरधाव ट्रक मागून उभ्या ट्रकवर आदल्याने झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या युवकाला अत्यवस्थ अवस्थेत चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. चमन कुमरे वय अंदाजे ४५ वर्षे असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक हा मूळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून तो सध्या राजूर येथे राहत होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरु आहेत.
रविवार दि. २८ सप्टेंबरला रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर ट्रकचा भीषण अपघात झाला. सोमनाळा फाट्यापासून जवळपास तीनशे मीटर अंतरावर एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. या ट्रकवर मारेगाव कडून वणीकडे येणारा भरधाव ट्रक मागून आदळला. या भीषण अपघातात ट्रकमध्ये बसून असलेले चार जण गंभीर जखमी झाले. हा ट्रक विटांची वाहतूक करीत असल्याचे समजते. विटा खाली करून वणीकडे येत असतांना मार्गात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला हा भरधाव ट्रक धडकला. हा अपघातग्रस्त ट्रक रामचंद्र दासरी यांच्या मालकीचा असल्याचे समजते. रस्त्यावर उभा असलेला ट्रक मागून भरधाव येत असलेल्या ट्रक चालकाच्या दृष्टीस न पडल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. आदल्या दिवशीपासून हा ट्रक रस्त्यात ब्रेकडाऊन असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
विटांची खेप खाली करून घरी परतणाऱ्या मजुरावर काळाने घाला घातला. ट्रक चालक गाव जवळ करण्याच्या प्रयत्नात असतांना मार्गात उभ्या असलेल्या ट्रकमुळे ही दुर्घटना घडली. ट्रक चालकाच्या ध्यानीमनी नसतांना अचानक रस्त्यावर उभा असलेला हा ट्रक डोळ्यासमोर आला. चालकाने अपघात टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्याला यात यश आले नाही. शेवटी ट्रकची डावी बाजू उभ्या ट्रकला धडकली आणि ट्रकमध्ये बसून असलेल्या मजुरांच्या किंचाळ्या फुटल्या. मजूर वेदनेने विव्हळत असतांना निंबाळा गावातील मनोज ढेंगळे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र यातील चमन कुमरे या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शाहरुख पठाण, प्रविण मेश्राम आणि एका मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: