डेंग्यू नियंत्रणासाठी वणी नगर परिषद व आरोग्य विभाग सज्ज – घराघरांतून जनजागृती मोहिमेची जोरदार सुरूवात
प्रशांत चंदनखेडे वणी :-
डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वणी नगर परिषद व आरोग्य विभागाकडून व्यापक प्रतिबंधात्मक कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या आदेशानुसार जुलै महिन्यापासून नगर परिषद क्षेत्रातील सर्व वार्डांमध्ये वस्तीसेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत घराघरात जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
एडिस इजिप्टाय या प्रकारच्या डासांमुळे पसरणारा डेंग्यू आजार नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती पाण्याच्या साचलेल्या ठिकाणी तपासणी केली जात असून, जिथे डासांच्या अळ्या आढळतात तिथे भांडी रिकामी केली जातात. तसेच जे भांडे रिकामे करता येत नाही त्यात टेमिफॉस द्रावण टाकून अळ्या नष्ट केल्या जात आहेत. यावेळी नागरिकांना डासांपासून होणाऱ्या आजारांबाबत आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती केली जात आहे.
नगर परिषदेने निवडलेल्या वस्तीसेविका (Breeding checker) दररोज ४५ ते ५० घरांना भेट देत आहेत. यामुळे केवळ १० दिवसांत प्रत्येक घराची तपासणी पूर्ण होत आहे. संपूर्ण मोहिमेत महिन्यातून दोनदा अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार असून ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे यांच्या नेतृत्वात ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे.
या उपक्रमाबाबत मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे म्हणाले, “घराघरांतून सुरू असलेल्या या सर्वेक्षण मोहिमेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य होईल. नागरिकांनी देखील घरगुती पातळीवर साचलेले पाणी त्वरित काढून टाकून सहकार्य करावे.”
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, अभियान व्यवस्थापक पौर्णिमा शिरभाते, तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक नरेश मेश्राम, हेमंत दुधे व विजय पेंदोरकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.
👉 वणीकरांनी डेंग्यूबाबत भीती न बाळगता खबरदारी घेण्याचे आणि नगर परिषदेच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
No comments: