Latest News

Latest News
Loading...

वणीच्या टिळक चौकात एलसीबी पथकाची धडक कारवाई, एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद; ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरातील मध्यवर्ती व प्रमुख वर्दळीचा चौक असलेल्या टिळक चौक परिसरात १० सप्टेंबरला संध्याकाळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धडाकेबाज कार्यवाही करीत अंमली पदार्थाची विक्री व खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या जवळून पथकाने महागडी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा एम.डी. (Mephedrone) पावडर तसेच गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल आणि मोबाईल हँडसेटसह तब्बल ३ लाख २४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबी पथकाची एमडी ड्रग्ज वरील अलीकडच्या काळातील ही दुसरी धडक कार्यवाही आहे. या कार्यवाहीमुळे शहरातील एमडी ड्रग्जच्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. शहरात एमडी ड्रग्जची नशा करणारेही बरेच शौकीन असल्याचे या कार्यवाहीने उघड झाले आहे. 

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचशील नगर येथील युगांत दिनेश दुर्गे (१९) हा नागपूर येथून एम.डी. पावडर वणी येथे विक्रीसाठी आणणार असल्याची विश्वसनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने टिळक चौक परिसरात सापळा रचला. तेथे काही वेळांनी सांगितलेल्या वर्णनाचा एक तरुण आला. त्याला भेटायला लगेच बुलेटने दुसराही तरुण आला. दोघांच्याही हालचाली पथकाला संशयास्पद वाटल्या. दरम्यान युगांत दुर्गे याने पांढऱ्या रंगाची पावडर असलेला पाऊच खिशातून काढून त्याचा साथीदार शाबाज सत्तार मिर्झा (३५, रा. साई नगरी, वणी) याला दाखविल्याने पथकाला हे दोघेही ड्रग्ज तस्कर असल्याची खात्री पटली. त्यांच्यात ड्रग्जची देवाण घेवाण सुरु असतांनाच पथकाने धाड टाकून मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.

एलसीबी पथकाने युगांत दुर्गेची झडती घेतली असता त्याच्या पॅंटच्या खिशातून दोन पाऊचमध्ये भरलेली ३ ग्रॅम ३८ मिली एम.डी. पावडर आढळून आली. या अंमली पदार्थाची किंमत १६,९०० रुपये एवढी आहे. याशिवाय त्यांच्या जवळून एक बुलेट मोटारसायकल (विनानंबर) आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपी युगांत दुर्गे याने एम.डी. ड्रग्ज हा अमली पदार्थ नागपूर येथील आयुष तांबे याच्याकडून आणल्याचे कबूल केले. तसेच हा अमली पदार्थ त्याचा साथीदार शाबाज मिर्झा याला विक्रीसाठी देणार असल्याचीही त्याने कबुली दिली. या दोन्ही आरोपींवर वणी पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर (पोस्टे. वणी) यांच्या नेतृत्वात सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोहवा सुनिल खंडागळे, सुधिर पांडे आणि एलसीबी पथकाने केली.

👉 या कारवाईनंतर वणी शहरात एकच खळबळ उडाली असून, एलसीबी पथकाच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.


No comments:

Powered by Blogger.