अपराधीक घटनांनी शहर हादरले! सरकारी कर्मचारी महिलेचा पाठलाग करून विनयभंग — चाकूच्या धाकावर कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी भालर रोडवर सोमवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. एका ३४ वर्षीय सरकारी कर्मचारी महिलेचा पाठलाग करून, तिचा विनयभंग करण्यात आला. एवढेच नाही तर महिलेला चाकूच्या धाकावर जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुनिल भाऊराव मोहीतकर (वय ५५, रा. जैन ले-आऊट, वणी) याच्याविरुद्ध कलम 74, 75, 78, 87, 296, 352, 351(2), 351(3) भा. दं. सं. (BNS) अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वणी शहरातील एका परिसरात राहतात आणि त्या वेकोलि कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास त्या भालर रोडने त्यांच्या स्कुटरवरून जात असताना वेकोलिमध्येच कार्यरत असलेला आरोपी सुनिल मोहीतकर हा त्याच्या टाटा हेरिअर कार (MH २९ BP ६६८८) मधून त्यांचा पाठलाग करत होता. तो नेहमीच त्यांचा पाठलाग करायचा.
त्यादिवशी त्याने अचानक फिर्यादीच्या स्कुटरसमोर कार थांबवून, तो कारमधून खाली उतरला आणि जबरदस्तीने महिला कर्मचाऱ्याला कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादीने विरोध केल्यावर, आरोपीने कारमधून चाकू काढून तिच्या मानेला लावला आणि “चुपचाप गाडीत बस नाहीतर जिवाने मारून टाकेन” अशी जीवघेणी धमकी दिली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार नोंदविली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेत आरोपीला ताब्यात घेतले. महिलेचे अपहरण करण्याकरिता आरोपीने वापरलेली आलिशान कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपी हा वेकोलि कामगार युनियनचा अध्यक्ष असून तो वेकोलि सेफ्टी बोर्डचा सदस्य देखील असल्याचे समजते. या गंभीर प्रकारामुळे राजकीय व वेकोलि क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून या गंभीर घटनेने शहर हादरले आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि प्रियंका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे वणी शहरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
No comments: