कामगारावर जीवघेणा हल्ला — जुन्या भांडणातून लाकडी काठीने डोक्यावर वार; उपचारासाठी जखमी युवकाचा नागपूरपर्यंत प्रवास!
प्रशांत चंदनखेडे वणी :-
जुन्या वैमनस्यातून मारेगाव शहरात सोमवारी रात्री घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका कामगारावर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना 12 ऑक्टोबरला रात्री ७ वाजताच्या सुमारास मारेगाव बसस्टँडजवळ घडली.
या प्रकरणी शंकर सुर्यभान कुचनकार (वय 30, रा. वार्ड नं. 16, सुभाष नगर, मारेगाव) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अंकुश रमेश मंजुळकर (वय 32, रा. टावर जळळ, मारेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
फिर्यादी शंकर कुचनकार हा रोजंदारी मजूर असून, तो कामावरून घरी जात असताना आरोपी अंकुश मंजुळकर हा मागून आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्यावर लाकडी काठीने जोरदार प्रहार केला. त्याने शंकरच्या डोक्याच्या उजव्या बाजूला, कपाळावर, डाव्या पायावर, नाकावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर काठीने एकामागून एक वार केले.
या हल्ल्यात शंकर रस्त्यावरच बेशुद्ध पडला. त्याच्यासोबत काम करणारा महेंद्र पन्नालाल जैन (रा. ग्वालियर, ह.मु. सुभाष नगर मारेगाव) हा मदतीला धावून आला असता, आरोपीने त्यालाही शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली.
दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत शंकर कुचनकार याला त्याचे सहकारी महेंद्र जैन आणि विशाल डोंगरे यांनी तातडीने मारेगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु तेथूनही पुढे त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला.
नागपूर येथे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याची गरज व्यक्त केली. मात्र “ऑपरेशनदरम्यान अर्धांगवायूचा धोका आहे” असे सांगितल्याने शंकर कुचनकार घाबरला आणि ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेत तो मारेगावला परतला.
नंतर त्याने घडलेल्या घटनेबाबत मारेगाव पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी अंकुश मंजुळकरविरुद्ध बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(२), ३५२ नुसार गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
No comments: