अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचे जंबो पॅकेज! देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आजवरची सर्वात मोठी मदत — ३१,६२८ कोटींची भरघोस तरतूद
प्रशांत चंदनखेडे वणी :-
अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांना तब्बल ३१,६२८ कोटींचे जंबो पॅकेज जाहीर करण्यात आले असून, ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत ठरली आहे. या मदतीचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी-जामनी व मारेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
💬 “शेतकऱ्यांच्या सोबतीला महायुती सरकार आहे उभं”
माजी आमदार बोदकुरवार म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिके, जनावरे, विहिरी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘शेतकऱ्यांना आधार देणारे’ निर्णय घेतले आहेत. ६५ मिलीमीटर पावसाची अट रद्द करून मदतीचा विस्तार ३ हेक्टरपर्यंत करण्यात आला आहे. एवढा व्यापक विचार आजवर कुठल्याही सरकारने केलेला नाही.”
🌾 शेतकऱ्यांसाठी मदतीचे तपशील
कोरडवाहू शेतकरी: १८,५०० प्रती हेक्टर, हंगामी बागायती: २७,००० प्रती हेक्टर, बागायती शेतकरी: ३२,५०० प्रती हेक्टर, पिकविमा धारकांना: १७,००० प्रती हेक्टर अतिरीक्त मदत, खरडून गेलेली जमीन: ४७,००० प्रती हेक्टर व नरेगामधून ३ लाख अतिरिक्त – अशी एकूण ३.५ लाखांची मदत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
🐄 पशुधनासाठी विशेष तरतूद
दुधाळ जनावर : ३७,५०० प्रती जनावर, ओढकाम जनावर : ३२,००० प्रती जनावर, लहान जनावर : २०,००० प्रती जनावर, शेळी/मेंढी : ४,००० प्रती जनावर, कुक्कुटपालन : १०० प्रती कोंबडी याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.
🏠 घर व व्यक्तिगत नुकसानीसाठी मदत
मृत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख प्रती व्यक्ती, अपंगत्व ४०–६०% : ७४,००० मदत, अपंगत्व ६०% पेक्षा अधिक : २.५ लाख मदत, घरांची पडझड झाल्यास पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घरे, कपडे व घरगुती वस्तू नुकसान : ५,००० प्रती कुटुंब, दुकानदार, टपरीधारक : ५०,००० प्रती लाभार्थी याप्रमाणे मदत देण्यात येईल.
🌱 शेतीसाठी अतिरिक्त सुविधा
गाळ काढण्यासाठी ३०,००० प्रती विहीर, कृषी विभागामार्फत मदत थेट खात्यावर (DBT), ई-के.वाय.सी. प्रक्रियेत सवलत, जमिन महसूलात सुट, कर्जवसुली स्थगिती, वीज बिलात माफी, शाळा-परिक्षा शुल्क माफी, आणि आर.ओ.ह.यो. अंतर्गत विशेष शिथिलता.
🙏 “धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद महायुती सरकार”
पत्रकार परिषदेत माजी आमदार बोदकुरवार यांनी म्हटले की, “आजवर कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झालेली नव्हती. ही मदत केवळ शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यापुरती नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासाला नवा आधार देणारी आहे. हीच देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेची ओळख आहे.”
पत्रकार परिषदेला भाजपचे विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे, गजानन विधाते, ऍड. निलेश चौधरी यांच्यासह वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “धन्यवाद देवाभाऊ!” आणि “जय महायुती सरकार!” असा स्वर निनादला होता.
No comments: