प्रशांत चंदनखेडे वणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी आणि यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांना घेऊन शिवसेनेने (उबाठा) आक्रमक पवित्रा घेत राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांचा ताफा अडवून त्यांना काळी फीत दाखविली. तसेच शासकीय आढावा बैठक सुरु असतांना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसेनेच्या १३ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. या तेराही पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १२ शिवसेना पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र ९ ऑक्टोबराला या बाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला. आणि आज १० ऑक्टोबरला या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची जामिनावर सुटका झाली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतांना वेळप्रसंगी अटक होण्याचीही पर्वा न बाळगलेल्या शिवसैनिकांचा आमदार संजय देरकर यांनी गळ्यात हार घालून सत्कार केला.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे ६ ऑक्टोबरला वणी येथे शासकीय आढावा बैठकीसाठी आले असतांना शिवसेना पक्षाने त्यांचा ताफा अडवून त्यांना काळ्या फिती दाखविल्या. एवढेच नाही तर शिवसैनिकांनी मंत्री महोदयांच्या वाहनासमोर लोटांगण घातले. त्यानंतर शिवसैनिकांनी शासकीय आढावा बैठकीकडे आपला मोर्चा वळविला. अतिवृष्टीने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागण्यांना घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान पोलिसांनी १३ शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना नंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका पदाधिकऱ्याचा जामीन मंजूर केला आणि १२ पदाधिकाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख संतोष कुचनकर, पुरुषोत्तम बुटे, गणपत लेडांगे, राजू तुराणकर, दिवाकर कोल्हेकर, मोहम्मद अन्सारी, भगवान मोहिते, मनिष बत्रा, जगन जुनगरी, संकेत मोहिते आणि प्रेमानंद धानोरकर यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आज १० ऑक्टोबरला हे सर्व पदाधिकारी जामिनावर बाहेर आले. या सर्व शिवसैनिकांचा आमदार संजय देरकर यांनी पुष्पहाराने सत्कार केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पेटून उठणाऱ्या शिवसैनिकांनी अटकेची पर्वा न करता आक्रमक पवित्रा घेत अतिवृष्टीने प्रचंड संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रखरतेने आवाज उठविला. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या न्याय हाकांसाठी केलेलं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं.
No comments: