खुनातील आरोपींच्या अवघ्या चार दिवसांत आवळल्या मुसक्या, मुलाने बायकोला नेले होते पळवून आणि पतीने त्याच्या वडिलांचा केला खून
प्रशांत चंदनखेडे वणी
विवाहित महिलेला प्रेम संबंधात अडकवून तिला पळवून नेणाऱ्या युवकाच्या वडिलांचा महिलेच्या पतीने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुढे आल्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास करून खून प्रकरणातील तीनही आरोपींना अवघ्या चार दिवसांत हुडकून काढत त्यांना जेरबंद केले. गावातीलच एका युवकाचा विवाहित महिलेवर जीव भाळला आणि त्याने तिच्यावर डोळा ठेऊन तिला पळवून नेले. युवकाने लग्नाच्या बायकोला पळवून नेल्याने पती प्रचंड क्रोधीत झाला होता. मागील चार महिन्यांपासून तो बायकोचा शोध घेत होता. बायकोला पळवून नेणाऱ्या युवकाच्या आई वडिलांना व बहिणीलाही त्याने युवकाबद्दल वेळोवेळी विचारणा केली. कधी संयमाने तर कधी धमकी देऊन तो बायकोला पळवून नेणाऱ्या युवकाची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच त्याचा संयम सुटला आणि सूडभावनेतून त्याने युवकाच्या वृद्ध वडिलाचे अपहरण करून त्यांचा खून केला. ६ ऑक्टोबराला सकाळी बेलोरा फाटा बसस्थानकाजवळ रक्ताच्या थारोळ्यात वृद्धाचा मृतदेह आढळून आला. आणि एकच खळबळ उडाली.
भद्रावती तालुक्यातील जुना सुमठाना येथे वास्तव्यास असलेल्या निलेश दिलीप ढोले याच्या पत्नीला गावातीलच नितेश विनायक कुडमेथे या युवकाने पळवून नेले. त्यामुळे निलेश ढोले हा रागाने तापला होता. त्याने नितेश कुडमेथे व पत्नीचा शोध घेण्याचा हरसंभव प्रयत्न केला. नितेशचे आई वडील व त्याच्या बहिणीकडेही त्याने नितेशबद्दल वेळोवेळी चौकशी केली. कधी प्रेमाने, कधी रागाने तर कधी धमक्या देऊन तो पत्नीबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान नितेशचे वडील विनायक माधव कुडमेथे व त्याची आई गाव सोडून चिखलगाव येथे राहण्यास आली. अशातच निलेश ढोले याचा संयम सुटला आणि त्याने ५ ऑक्टोबराला वणी शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधारे किराणा दुकानासमोरून विनायक कुडमेथे यांचे अपहरण केले. आणि बेलोरा फाटा येथे नेऊन त्यांचा निर्घृण खून केला.
विनायक कुडमेथे यांच्या सोबत किराणा आणण्यासाठी गेलेला त्यांचा दहा वर्षीय नातू रडत घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी विनायक कुडमेथे यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर वणी घुग्गुस मार्गावरील बेलोरा फाटा येथे रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेहच आढळून आला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मृत विनायक यांची मुलगी प्रिया तिराणकर यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आणि पूर्ण घटनाक्रम सांगितला. भावाने आरोपीची लग्नाची बायको पळवून नेल्याने त्याने त्याचा सूड वडिलांवर उउगविल्याचे प्रिया तिराणकर यांनी तक्रारीत म्हटले. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींचा कसून शोध घेणे सुरु केले.
आरोपींचा शोध लावण्याचे कौशल्य अंगी असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांनी सर्व खबरी यंत्रणा अलर्ट करून आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरु केला. आरोपींच्या शोधार्थ विशेष पथक गठीत करून त्यांना त्यांच्या मागावर ठेवले. आरोपींचे वेळोवेळी लोकेशन ट्रेस करीत पोलीस त्यांचा ठावठिकाणा शोधत असतांनाच आरोपी हे यवतमाळ एमआयडीसी परिसरात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार माधव शिंदे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने यवतमाळ एमआयडीसी परिसरात शोध मोहीम राबवून ९ ऑक्टोबराला दुपारी आरोपी निलेश ढोले (३६) याच्यासह खुनात सहभागी असलेला त्याचा नातेवाईक आशिष मारोती नैताम (३५) रा. सास्ती (गवरी) ता. राजुरा व वाहन चालक मिथिलेश बिंदेश्वर जाधव (५५) रा. मोरवा जि. चंद्रपूर अशा तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासाची योग्य दिशा व गुन्हेगारांचा शोध लावण्यात तरबेज असलेल्या ठाणेदार माधव शिंदे यांनी अवघ्या चार दिवसांत खुन्यांचा शोध लावून त्यांना बेड्या ठोकल्या.
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक, एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, सपोनि रावसाहेब बुधवंत, पोलीस शिपाई अविनाश बानकर, सुनील दुबे, अजय वाभीटकर व पोलीस पथकाने केली.
No comments: