Latest News

Latest News
Loading...

अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव, आरक्षणाने बबदलले राजकीय समीकरण --- मात्तबरांचा झाला हिरमोड


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना आज ६ ऑक्टोबरला आगामी वणी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्ष पद राखीव निघाल्याने वणीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनपेक्षित अशी आरक्षणाची सोडत निघाल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दावेदारी सांगणाऱ्या राजकीय धुरंधरांचा स्वप्नभंग झाला आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याकरिता अनेक जण बाशिंग बांधून होते. 

पक्षात वजन असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीही सुरु केली होती. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षात इच्छुकांची भरमार असतांना आरक्षणाने मात्र त्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव निघाल्याने राजकीय पुढाऱ्यांचा उत्साह ओसरला असून राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी धडपड करणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण आले आहे. तसेच राजकीय पक्षांवरही चिंतेचे ढग दाटले असून नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवारांचा शोध घेतांना पक्षांचाही चांगलाच कस लागणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाला आदेश दिल्यानंतर राजकारणाला मोठा वेग आला. राजकीय पुढारी कामाला लागले. राजकीय पक्षात मोठी उलथापालथ झाली. अनेकांनी आपापल्या सोयीने पक्षांतर केले. नंतर पक्षात आपलं वजन वाढविण्याचा हरसंभव प्रयत्न केला. जवळपास चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय मात्तबरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राजकीय पुढारी आपापल्या पद्धतीने उमेदवारीसाठी पक्षांकडे मोर्चेबांधणी करू लागले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांचे पदाधिकारी पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले. गावातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन निवेदनांचा पाऊस पडू लागला. प्रत्येकच जण उमेदवारीसाठी आपली दावेदारी पक्की करू लागला. अशातच नगर पालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकड़ून हालचाली सुरु झाल्या. प्रभाग रचनेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर करण्यात आली. यात वणी नगर पालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निघाले आणि शहरातील राजकीय वर्तुळावर नैराश्येचे काळे ढग पसरले. 

मात्र या आरक्षणामुळे अनुसूचित जमातीतील महिलांना राजकीय प्रवाहात येण्याची संधी चालून आली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी नगराध्यक्ष पद भूषविण्याचा या आरक्षणामुळे मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्ष पद राखीव निघाल्याने या प्रवर्गाला नेतृत्व कौशल्य दाखविण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यामुळे शिक्षित व तडफदार महिलांनी पुढे येऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी आणि विकसनशील धोरणातून शहरवासीयांपुढे आपल्या कार्याचा एक नवा आदर्श उभा करावा.

नगर पालिकेचा कार्यकाळ बरखास्त होण्यापूर्वी नगर पालिकेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे होते. त्यावेळी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघालं होतं. भारतीय जनता पक्षाकडून तारेंद्र बोर्डे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविली होती. आणि एकहाती त्यांनी विजय मिळविला होता. ते नगराध्यक्ष असतांना नगर पालिकेवर भाजपचीच सत्ता होती. त्यावेळी नगर पालिकेत भाजपचे २२ नगर सेवक निवडून आले होते. आता मात्र नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत अनुसूचित जमाती (महिला) करीता निघाल्याने राजकीय पक्षांना योग्य उमेदवार शोधतांना चांगलाच कस लागणार आहे.

 


No comments:

Powered by Blogger.