Latest News

Latest News
Loading...

शिवसेना (उबाठा) पक्षाने अडविला मंत्री अशोक उईके यांचा ताफा, काळे दुपट्टे दाखून मंत्र्यांच्या वाहनासमोर घातले लोटांगण


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी येथे शासकीय आढावा बैठकीकरिता आलेले आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांचा ताफा बसस्थानकाजवळ अडवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना काळे दुपट्टे दाखविल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री अशोक उईके यांच्या वाहनासमोर लोटांगण घातले. यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी नारेबाजी करीत शिवसेनेने मंत्री महोदयांचा ताफा रोखून धरला. यावेळी पोलिसांनी मंत्र्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून देण्याकरिता आंदोलकांना ताफ्यासमोरून हटविण्याचा बळपूर्वक प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 
अतिवृष्टीने शेत पीकाचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला आला असतांना शासन शेतकऱ्यांना योग्य मदत जाहीर करण्याऐवजी त्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसैनिकांनी आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांचा ताफा अडविला व त्यांना काळे दुपट्टे दाखविले. आज ६ ऑक्टोबरला मंत्री अशोक उईके हे वणी येथे शासकीय बैठकीकरिता आले असतांना शिवसेना (उबाठा) पक्षाने बस्थानकाजवळ त्यांचा ताफा अडविला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या वाहनासमोर अक्षरशः लोटांगण घातले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा, अशा शिवसैनिकांनी जोरजोरात घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्रांच्या ताफ्याची वाट मोकळी करून देतांना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. शेवटी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अतिवृष्टीने शेतातील अख्ख पीक वाहून गेलं. पीकच काय तर शेतातील मातीही वाहून गेली. शेत ओसाड झालं. सुपीकता नष्ट झाली. शेताचं सपाट मैदान झालं. शेतात नुसता चिखल उरला. शेताला तळ्याचं स्वरूप आलं. शेतजमीन पूर्णतः खरडून निघाली. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर निसर्गानं पाणी फेरलं. हातातोंडाशी आलेलं पीक अतिवृष्टीने नेस्तनाबुत झालं. आस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी आसवांत भिजला आहे. सणासुदीच्या दिवसांत त्याच्या डोळ्यासमोर काळोख दाटला आहे. निसर्ग कोपल्याने शेत पीकांची पूर्णपणे धूळधाण झाली आहे.  

अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पार वाताहत झाली असून शेतीची मशागत व पिकांच्या लागवडीवरील खर्च पूर्णतः व्यर्थ गेला आहे. आस्मानी संकटाने पोळलेल्या शेतकऱ्याच्या वेदनांवर मायेची फुंकर घालण्याची गरज असतांना त्यांच्यावर सुलतानी अन्याय केला जात आहे. अख्ख शेत पाण्यात बुडाल्याने शेकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले असतांना त्यांना सरकार तुटपुंजी मदत देऊ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जगण्यामरण्याचे प्रश्न निर्माण होऊनही शासनाकडून त्यांना योग्य आर्थिक मदत जाहीर करण्यात न आल्याने सरकार विषयी शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे.

No comments:

Powered by Blogger.