Latest News

Latest News
Loading...

झरी (जामणी) येथे वंचित बहुजन आघाडीचे निषेध आंदोलन; सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे मनुवादी व्यवस्थेचे षड्यंत्र – राजू निमसटकर


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाजादरम्यान ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी (VBA) तर्फे झरी (जामणी) येथे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

या वेळी बोलताना निमसटकर म्हणाले की,

> “सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर तो देशाच्या संविधानावर आणि न्यायदानाच्या पवित्र तत्त्वांवर झालेला थेट प्रहार आहे. समाजात जाती-धर्माच्या नावाने फूट निर्माण करण्याचे षड्यंत्र आज मनुवादी व्यवस्था रचत आहे, आणि हा हल्ला त्या व्यवस्थेचेच द्योतक आहे.”

ते पुढे म्हणाले की,

> “हल्लेखोर वकील राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबनाची कार्यवाही पुरेशी नाही. न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्याच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायावरचा विश्वास डळमळू शकतो.”

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही”, “न्यायव्यवस्थेचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित, बहुजन, आदिवासी, शोषित, पीडित घटकांना संघटित करून वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी शक्ती बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

निवेदन देतांना राजू निमसटकर यांच्यासह अनंता खाडे, रवींद्र तेलंग, रवी वनकर, प्राणशील पाटील, श्रीराम भोयर, शरद पळवेकर, अनुप भांदककर, अमोल भोयर, रमेश अवतरे, भीमराव वानखेडे, प्रशांत लोहकरे, दत्ता परचाके, प्रेम प्रताप सिडाम, राजू कांबळे, आनंद भांडककर, देवानंद निखाडे, गौतम हस्ते, सुखदेव वाघमारे, निकेश कांबळे, शांताराम देवतळे, नथुभाऊ कोडापे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Powered by Blogger.