जिल्हा परिषद-पंचायत समिती गण गटाचे आरक्षण जाहीर, दिग्गजांबरोबरच नवख्यांनीही कसली कंबर, बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याचा निर्धार
प्रशांत चंदनखेडे वणी :-
मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तसेच राजकीय क्षेत्रासह संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा अखेर डंका वाजला असून आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. वणी पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पंचायत समितीचे १० गण व जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी देखील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याने राजकारणाला वेग आला आहे. पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली असून इच्छुकांनीही पक्षांकडे उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींचा हिरमोड झाला असला तरी मनासारखे आरक्षण निघाल्याने काही जण उत्साहात दिसून येत आहेत. त्यातच राजूर गणाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्याने दिग्गजांबरोबरच नवखेही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार असून निवडणूका रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमवार १३ ऑक्टोबरला वणी पंचायत समितीचे १० गण व जिल्हा परिषदेच्या ५ गटांची आरक्षण सोडत महसूल भवन येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या अध्यक्षतेत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार व सहाय्यक निवडणूक अधिकारी निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, विवेक पांडे यांच्यासह इतरही अधिकारीवर्गाची उपस्थिती होती. एका ५ वर्षीय बालकाच्या हाताने चिठ्या काढून गण व गटाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये पंचायत समितीच्या १० गणात चिखलगाव सर्वसाधारण महिला, नांदेपेरा सर्वसाधारण प्रवर्ग (पुरुष/महिला), शिरपूर सर्वसाधारण महिला, वेल्हाळा (वसाहत) सर्वसाधारण प्रवर्ग (पुरुष/महिला), वागदरा सर्वसाधारण महिला, राजूर अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला/पुरुष), कायर अनुसूचित जमाती महिला, घोन्सा अनुसूचित जमाती प्रवर्ग (महिला/पुरुष), तरोडा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला/पुरुष) आणि शिंदोला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठीही आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यामध्ये वागदरा-घोन्सा नामाप्र (जनरल), शिरपूर-कायर नामप्र (महिला), शिंदोला-तरोडा सर्वसाधारण, राजूर-चिखलगाव आणि नांदेपेरा-वेल्हाळा सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.
पंचायत समिती सभापती पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी निघाल्याने या समाजातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून गट गणांच्याही आरक्षणामध्ये महिलांचाच वरचष्मा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांना सक्षम राजकीय नेतृत्वाची मिळालेली ही सुवर्ण संधी असल्याचा सूर उमटू लागला आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने गावपुढारी कामाला लागले असून राजकीय पक्षांनीही डावपेच आखणे सुरु केले आहे.
जवळपास चार वर्ष विलंबाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजल्याने राजकीय उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्तबर व दिग्गजांना मात देण्याकरिता नवख्यांनीही कंबर कसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रतिष्ठेबरोबरच कसोटीपूर्णही होणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे. नव्या दमाचे शिक्षित तरुणही राजकारणाची चव चाखण्याच्या तयारीत असून अनेकांनी निवडणूक रिंगणात उडी घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात युवा पिढीचं चातुर्य व डावपेच खिंडार तर पडणार नाही ना, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
No comments: