प्रशांत चंदनखेडे वणी :-
उभ्या नादुरुस्त ट्रकवर मागून दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार दि. २ ऑक्टोबरला रात्री ७.३० वाजताच्या सुमारास वणी कायर मार्गावरील उमरी गावाजवळ घडली. हे दोन्ही तरुण दुचाकीने वणीला येत असतांना हा भीषण अपघात घडला.
मुकुटबनला काही कामानिमित्त गेलेले हे तरुण आपली कामे आटपून दुचाकीने वणीला येत असतांना उमरी गावाजवळ दोन ते तीन दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला (MH ३४ BG ८९६२) मागून त्यांची दुचाकी धडकली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण घटनास्थळीच ठार झाले. या भीषण अपघातात दोन्ही तरुणांचा करून अंत झाला. सचिन प्रकाश येलरवार (२३) रा. टिळक नगर व संदीप विजय चामुलवार (३८) रा. रंगारीपुरा अशी या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. काल सर्वत्र दसऱ्याचा सण साजरा होत असतांना या दोन युवकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील कर्त्या तरुणांचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्य मार्गांवर नादुरुस्त अवस्थेत किंवा अन्य कुठल्याही कारणांनी उभ्या राहणाऱ्या ट्रकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मार्गात नादुरुस्त असलेले मालवाहू ट्रक रात्री दृष्टीस पडत नसल्याने भीषण अपघात घडू लागले आहेत.
वणी मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर मागून येणारा दुसरा ट्रक आदळल्याने एका युवकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. ही अपघाताची घटना ताजी असतांनाच उभ्या ट्रकवर मागून दुचाकी आदळल्याने दोन निष्पाप जीवांचा बळी गेला. मुख्य मार्गांवर नादुरुस्त होऊन उभे राहणारे ट्रक रात्री दृष्टीस पडतील, अशी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. निष्काळजी व बेजबाबदारपणे ट्रक उभे केले जातात. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ट्रक चालक व मालकांच्या बेजबाबदारपणाला वचक बसेल अशा प्रकारची कार्यवाही त्यांच्यावर होणे गरजेचे झाले असल्याचा सूर आता नागरिकांमधून उमटू लागला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
No comments: