डमी लोकांच्या नावावर ६.६८ कोटी रुपयांचे कर्ज, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना अटक, आज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे ठेवीदारांचे लक्ष
त्यामुळे शरद मैंद हे परत एकदा चर्चेत आले असून कर्ज वाटपाच्या नावाखाली ते कर्जदारांची फसवणूक करीत असल्याचे आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहेत. त्यांनी कर्जदारांना कर्जातच गुंतवून ठेवले. आणि काही डमी लोकांच्या नावावरही त्यांनी कर्ज जारी केले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. कर्ज न घेतलेल्या नागरिकांना त्यांनी कर्जदार केल्याचा खुला आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ६.६८ कोटी रुपयांचे बोगस कर्ज जारी केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. या प्रकरणाची शनिवारी न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे बँकिंग क्षेत्राशी संबंधित सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असले तरी शरद मैंद यांना दोनदा अटक झाल्याने त्यांच्या आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेवीदार प्रचंड गोंधळात सापडले आहेत. ही बातमी पोलीस तक्रार आणि विविध वृत्त माध्यमांवरून प्रसारित झालेल्या वृत्तांच्या आधारे घेण्यात आली आहे.
पतसंस्थेच्या रक्कमेतून बँकेत उलाढाल, कर्जाच्या तगाद्यापायी वर्मा यांची आत्महत्या
पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष हे स्वतः शरद मैंद यांचे वडील आहेत. त्यामुळे भारती मैंद पतसंस्थेचा संपूर्ण कारभार शरद मैंद हेच पाहत असल्याचे बोलले जाते. शरद मैंद हे पतसंस्थेच्या रक्कमेतून बँकेत उलाढाल करीत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. कंत्राटदार व्ही.पी. वर्मा यांनी शरद मैंद यांच्या कडून कर्जाची उचल केली होती. मात्र मुन्ना वर्मा यांच्यावर पुसद अर्बन बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढतच गेला. व्याजापोटी कर्जाची रक्कम वाढतच गेल्याने त्यांना व्याज भरणे कठीण झाले.
त्यामुळे पुसद अर्बन बँकेच्या व्याजाची रक्कम भरण्याकरिता वर्मा यांना भारती मैंद पतसंस्थेतून कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले. अशातच मुन्ना वर्मा यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत गेला आणि शरद मैंद यांनी त्यांच्याकडे कर्ज भरण्याकरिता तगादा लावल्याने वर्मा यांनी शेवटी आत्महत्या केली. पोलीस चौकशीत नंतर शरद मैंद यांना त्यांच्या आत्महत्येस जबाबदार धरण्यात आले. त्यांच्यावर वर्मा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला व त्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली. मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर झाला व ते जामीनावर बाहेर आले.
हे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांनाच त्यांच्यावर ६.६८ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून तशी तक्रारही पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने त्यांना परत अटक झाली आहे. त्यांच्यावर कर्ज घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून पुसद अर्बन बँकेचे ग्राहक व ठेवीदार काळजीत आले आहेत. बँकेत जमा असलेल्या आपल्या कष्टाच्या पैशाबाबत ठेवीदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मुन्ना वर्मा यांनी शरद मैंद यांच्या कर्जाच्या तगाद्यापायी आत्महत्या केल्याने हे कर्ज घोटाळा प्रकरण उजेडात आले आहे. शरद मैंद यांनी १४ डमी लोकांच्या नावावर ६.६८ कोटी रुपयांचे बोगस कर्ज जारी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पोलीसांनी उघडकीस आणले हे गंभीर प्रकरण
हे गंभीर प्रकरण पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या आणखी खोलात गेले. या संदर्भात पोलिसांनी कंत्राटदार चंद्रसेन यादव यांच्याशी संपर्क साधला असता शरद मैंद यांचा हा कर्ज घोटाळा समोर आला. २०२३ साली कंत्राटदार चंद्रसेन यादव यांनी भारती मैंद पतसंस्थेतून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. तेंव्हा त्यांना शरद मैंद यांनी आधार कार्ड व पॅन कार्ड असलेले १२ साक्षीदार आणण्यास सांगितले. त्यावेळी यादव यांनी आधार व पॅन कार्ड असलेले ९ साक्षीदार शरद मैंद यांच्याकडे नेले. त्या सर्व साक्षीदारांच्या मैंद यांनी कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्या आणि त्यांना परत पाठविले. तेंव्हा चंद्रसेन यादव किंवा त्या साक्षीदारांना त्यांच्यावर कर्ज असल्याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. मात्र वर्मा आत्महत्या प्रकरणाची चौकशी करतांना पोलीसांना १४ डमी लोकांच्या नावावर एकूण ६.६८ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले.
पोलीसांनी चंद्रसेन यादव यांच्याकडे याबाबत चौकशी केल्यानंतर बोगस कर्ज घोटाळ्याचा हा प्रकार उघडकीस आला. यादव यांना त्यावेळी कर्ज नाकारल्यानंतर त्यांना परत कर्जाची आवश्यकता भासल्याने त्यांनी मार्च २०२५ ला पुन्हा एकदा भारती मैंद पतसंस्थेकडे कर्जासाठी अर्ज केला. तेंव्हा त्यांना आधार व पॅन कार्ड असलेले सहा साक्षीदार आणण्यास सांगण्यात आले. कर्जाच्या आवश्यकतेमुळे त्यांनी पाच साक्षीदार आणले. आणि त्यांना १ कोटी ९५ लाखांचे कर्ज मंजूर झाले. मात्र त्यांना १ कोटी ८ लाख रुपयेच देण्यात आले. अशातच मुन्ना वर्मा आत्महत्या प्रकरणातील संशयातून त्यांनी पतसंस्थेत चौकशी केली असता हे धक्कादायक वास्तव त्यांच्यापुढे आले. त्यांनी त्यावेळी आणलेले ९ साक्षीदार हे साक्षीदार नव्हते तर कर्जदार असल्याचे त्यांना कळाले. अशा १४ लोकांवर ६.६८ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पोलीसांच्या चौकशीनंतर यादव यांनी दिली पोलीसांत तक्रार
साक्षीदार म्हणून आलेल्या त्या गरीब मजुरांना आपल्यावर कर्ज असल्याची कल्पना देखील नव्हती. तारण ठेवायला कुठलीही मालमत्ता नसतांना गरीब लोकांना एवढी मोठी रक्कम कर्जापोटी देण्यात आल्याने यादव संभ्रमात सापडले. कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन आणि त्यांच्या कडून आधार व पॅन कार्ड मिळवून तसेच त्यांच्या नावे बोगस कागदपत्र तयार करून त्यांच्यावर खोटे कर्ज दाखविण्यात आल्याचे यादव यांच्या लक्षात आले. अशातच मुन्ना वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीसांच्या हाती ही माहिती लागल्यानंतर पोलीसांनी चंद्रसेन यादव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची चौकशी केली.
तेव्हा यादव यांनी या कर्ज घोटाळ्याचा उलगडा केला. तसेच शरद मैंद यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रारही दाखल केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलीसांनी शरद मैंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज ४ ऑक्टोबरला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असून न्यायालयाच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद मैंद यांचे हे कर्ज घोटाळा प्रकरण समोर आल्याने ठेवीदार चांगलेच गोंधळात सापडले आहेत. बहुतांश ठेवीदार आपले पैसे काढण्याकरिता बँकेत गर्दीही करू लागले आहेत. ही माहिती वेगवेगळया वृत्त माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमधून समोर आली आहे.
No comments: