प्रशांत चंदनखेडे वणी :-
आपत्ती ही कधी, कुठे आणि कशा स्वरूपात येईल याचा अंदाज बांधता येत नाही. नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, अशा संकटसमयी सजगता आणि तत्पर प्रतिसाद यांवरच जीवितहानी टळू शकते. हाच संदेश देण्यासाठी टि.डी.आर.एफ. (आपत्ती व्यवस्थापन दल) तर्फे वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान व सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन टि.डी.आर.एफ. संचालक हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या नेतृत्वाखाली तर प्रत्यक्ष मार्गदर्शन मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान जलील सैय्यद यांनी केले. विद्यार्थ्यांना संकट काळात स्वतःसह इतरांचा जीव वाचविण्याचे उपाय, आपत्कालीन परिस्थितीत कोणते निर्णय घ्यावेत, काय करावे व काय टाळावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नाही तर राष्ट्रसेवेचे आवाहन करण्यात आले. टि.डी.आर.एफ. च्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना आग लागणे, विज पडणे, महापुर, भूकंप, रस्ते अपघात, इमारत कोसळणे, प्रथमोपचार, पूर संरक्षण यांसह विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यांचा यात समावेश असून ११ महिन्यांच्या या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
येत्या रविवारपासून गव्हर्नमेंट हायस्कूल, वणी येथे दर रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत हे प्रशिक्षण सुरु होणार असून सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना फायर सेफ्टी ऑफिसर, फायर ब्रिगेड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तसेच खाजगी क्षेत्रातील सेफ्टी ऑफिसर अशा शासकीय व खासगी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सतीश पोटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुस्कान जलील सैय्यद उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद हुड, कमलेश बावणे, साक्षी देशपांडे, चैताली भोयर, सारिका झाडे तसेच टि.डी.आर.एफ.चे आस्था मोगरे, वैभव मडावी आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹 या उपक्रमामुळे वणी तालुक्यातील युवकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढून सामाजिक जबाबदारीसोबत करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होणार आहेत.
No comments: