प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव शहरात काल सायंकाळी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी आकाश मनोहर भेले (वय 32, रा. भिवाजी वार्ड क्रं १७) यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार, दोन तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करून जातीवाचक अपशब्द वापरत अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ३ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा–सातच्या सुमारास आकाश भेले यांना त्यांच्या वडिलांनी फोन करून सांगितले की, दोन युवक घराच्या गेटजवळ येऊन गोंधळ घालत आहेत. आरोपींमध्ये श्रेयश चिट्टलवार (वय 23, रा. वणी) आणि आदित्य दास (वय 23, रा. वणी) यांचा समावेश असून, त्यांनी “जर एका तासात आकाश आणि महेश तुम्ही घराबाहेर आलात नाही तर हातपाय तोडून जिवाने मारतो” अशी धमकी दिली, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
यानंतर आरोपींनी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत “तुम्ही किती आहात ते पाहून घेतो” असे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर, नंतर आकाश यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आदित्य दास याने पुन्हा एकदा त्यांना धमकी देत अपमानास्पद व जातीवाचक शब्दांचा वापर केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मारेगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. आरोपींविरुद्ध अश्लील शिवीगाळ, जातीय अपमान, दादागिरी आणि जीवे मारण्याची धमकी या गंभीर प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आकाश भेले यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी श्रेयस चिट्टलवार आणि आदित्य दास या दोन्ही आरोपींवर बीएनएसच्या कलम २९६, ३(५), ३५१(२) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va), 6 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
🔹 स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील नागरिकांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली असून, जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी भावना त्यांच्यामधून व्यक्त होत आहे.
👉 या घटनेमुळे प्रचंड मनःस्ताप व्यक्त करण्यात येत असून, सामाजिक एकोप्याला ठेच पोहोचविणारे हे कृत्य असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. जातीय तेढ वाढविणाऱ्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments: