Latest News

Latest News
Loading...

निलजई येथील दाम्पत्याला जातीयवाचक शिवीगाळ व रोजगारावर गदा; अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

                                      

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील निलजई गावात जातीय अपशब्द व धमक्या दिल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. गावातील एका मजुर दांपत्याला “गाव सोडा” असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच रोजगाराच्या संधींवरही गदा आणण्यात आल्याने पीडित महिलेने अखेर पोलिसात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायदा व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादी साधना प्रशांत नगराळे (वय 37, रा. निलजई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या पतीसह मजुरीचे काम करून उपजीविका करतात. काही वर्षांपूर्वी गुजरातेत वास्तव्यास असलेले हे दांपत्य, जून महिन्यात निलजई गावात परतले आणि तेथे किरकोळ दुकान सुरू करून उदरनिर्वाह करीत होते.

मात्र गावातील मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे (वय 48, रा. निलजई) याने त्यांना “तुम्ही या गावचे रहिवासी नाही, येथे राहू नका” असे म्हणत सतत त्रास दिला. ३० ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभेनंतर साधना नगराळे यांना व त्यांच्या पतीला आरोपीने घरासमोर उभे राहून जातिवाचक शिवीगाळ केली. “साले ... तुम्ही गावात कसे राहता?” अशा अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

मात्र त्यानंतरही या दांपत्याने मनोज डंभारे यांच्या धास्तीमुळे त्यावेळी पोलिसांत तक्रार केली नाही. परंतु त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी निलजई गावालगत असलेल्या जीआरएन कंपनीत रोजगारासाठी त्या दोघांनी उपसरपंच मारोती भोसले यांच्यासह भेट दिली असता, आरोपी डंभारे तेथे दाखल झाला. त्याने थेट कंपनी अधिकाऱ्यांना “या व्यक्तींना येथे कामावर घेतले तर कंपनी बंद पाडीन” अशी धमकी देऊन त्यांचा रोजगार अडवला.

या प्रकारामुळे साधना नगराळे व त्यांचे पती उपसमारीच्या स्थितीत आले असून, आरोपीमुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या गंभीर तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी मनोज ऊर्फ मंजु भाऊराव डंभारे याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

🔹 घटनेनंतर स्थानिकांमध्ये संताप
घटनेनंतर निलजई परिसरात तणावाचे वातावरण असून, जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी गावातून केली जात आहे.

👉 या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात सुरू असलेले जातीय तणाव व सामाजिक असुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पोलिसांचा पुढील तपास आणि कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.