प्रशांत चंदनखेडे वणी :-
मजुरीच्या पैशाच्या वादातून तरुणावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी गावातील पंचशील चौकात घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिजीत दिनेश नगराळे (वय 20, रा. वनोजादेवी) हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून मारेगावातील एका कॅटरिंगमध्ये काम करतो. फिर्यादी व साहील सुखदेव काळे यांच्यात मजुरीच्या पैशांवरून वाद झाला होता. त्यातून 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता पंचशील चौकात साहील काळे याने फिर्यादीवर हल्ला चढवून त्याच्या डोक्यावर हातातील कडे मारून जखमी केले.
यानंतर फिर्यादी घरी परतल्यावर साहीलचा भाऊ राकेश काळे (वय 27) हा देखील अभिजित नगराळे याच्या घराच्या अंगणात आला आणि त्याला व त्याच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून नंतर त्यांचा वाद सोडविला.
त्यानंतर अभिजित नगराळे याने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहील काळे (२१) व राकेश काळे (२७) या दोन आरोपी भावंडांविरुद्ध मारहाण व जीवघेणी धमकी दिल्याप्रकरणी भा.न्या.स.कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
No comments: