प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कायर ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारीच उपस्थित राहात नसल्याची तक्रार गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. दुपारनंतर ग्रामपंचायतीचा दरवाजा नेहमी बंद असतो. कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे बंधन नसल्यागत कर्मचारी वागत आहेत. कर्मचाऱ्यांकडून वेळेचे बंधन पाळल्या जात नाही. कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरु आहे. कर्मचाऱ्यांवर सरपंचाचा कुठलाही वचक राहिल्याचे दिसत नाही. दुपारनंतर ग्रामपंचायतेत कुठलाही कर्मचारी हजर राहत नसल्याने तक्रारी, दाखले व इतर महत्वाच्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यामधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. त्यामुळे सरपंचांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी कायर ही एक ग्रामपंचायत आहे. कायर गावातील लोकसंख्याही मोठी आहे. तसेच बाजारपेठही मोठी आहे. ग्रामपंचायतीत दरदिवशी नागरिक आपली कोणती ना कोणती कामे घेऊन येतात. मात्र दुपारनंतर कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली जात आहे. पाणी पुरवठा कर्मचारी, कार्यालय कर्मचारी तथा स्वच्छता कर्मचारी दुपारनंतर कार्यालयात हजर राहत नसल्याने कार्यालयाचा दरवाजा नेहमी बंद दिसतो. ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांना हजर राहणे गरजेचे असतांना देखील कर्मचारी आपल्या मनमर्जीने कार्यालयातून गायब राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी कमालीचा संताप दिसून येत आहे. दुपारनंतर ग्रामपंचायत कार्यालयच बंद राहत असल्याने नागरिकांची अनेक महत्वाची कामे खोळंबली जात आहे. त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या विनाकारण चकरा माराव्या लागत असल्याने गावकऱ्यांमधून कमालीचा असंतोष खदखदत आहे. दुपारनंतर कर्मचारी गुल होत असल्याने कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरपंचांनी कर्मचाऱ्यांची कान उघाडणी करावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

No comments: