Latest News

Latest News
Loading...

श्यामा (मिस्त्री) संगमवार यांच्या निधनाने शोककळा — कष्टाळू हात, हसतमुख चेहरा हरपला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

लेथ मशीणवाले म्हणून आपल्या कष्टाने आणि प्रामाणिक कामाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्यामा मिस्त्री उर्फ श्यामा नरेश संगमवार (वय ४०, रा. राजूर (कॉ.)) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजूर कॉलरीसह वणी शहरात शोककळा पसरली आहे. हसमुख, आपुलकीने वागणारा आणि गरजूंना मदत करणारा श्यामा मिस्त्री परिसरात सर्वांनाच परिचित होता. परिसरात त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते.   

पाच दिवसांपूर्वी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा असा हा अकाली मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

कामातली तल्लख नजर, हातातील कौशल्य आणि ग्राहकांविषयीचा आदर—या गुणांनी त्यांनी लेथ व्यवसायात विश्वासाची मजबूत छाप निर्माण केली. अगदी साध्या संभाषणातही माणूस जिंकण्याची त्यांची कला अनेकांना आजही आठवते. त्यांच्या जाण्याने वणी शहरातील एक प्रेमळ, हसरा आणि मनमिळावू सहकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. तरुण वयातच त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून शहरातील सामाजिक, व्यावसायिक आणि स्थानिक स्तरावरही शोककळा पसरली आहे.

वणीने आज एक हसतमुख ‘मिस्त्री’ गमावला—ही पोकळी दीर्घकाळ भरून न निघणारी आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.