Latest News

Latest News
Loading...

प्रभाग 1 मध्ये भाजपची भव्य रॅली; उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद, नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार वेगात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नगर पालिका निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज (24 नोव्हेंबर) काढलेल्या भव्य रॅलीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. तसेच या रॅलीने स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण केले. प्रभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या भाजपच्या नियोजनबद्ध प्रचार मोहिमेचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भाजपच्या या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दररोज एका प्रभागात घरोघरी भेटी, कॉर्नर सभा आणि जनसंपर्क उपक्रम राबवून भाजपकडून निवडणूक प्रचाराची गती कायम ठेवली जात आहे. आजच्या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ झालेली घोषणाबाजी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाची लाट पाहायला मिळाली.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः घराघरांत जाऊन मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला होता. विकासकामे हीच खरी ओळख असल्याचा दावा करून पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग 1 अ चे उमेदवार मीनाक्षी शैलेश जुनघरे व प्रभाग 1 ब चे उमाकांत महादेवराव जोगी यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारालाही रॅलीदरम्यान नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
कॉर्नर सभेत पक्षनेत्यांनी शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक प्रश्नांवरील कामकाज आणि प्रभागातील विकासाची सातत्यपूर्ण गती यांचा आढावा घेत मतदारांना विश्वास दिला की भाजपच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू शकते. पक्षाच्या या भूमिकेचे समर्थन करत कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रभाग 1 हा भाजपच्याच खात्यात जाण्याचा विश्वास व्यक्त केला.

आजच्या प्रचार कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सचिव संतोष डंबारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव श्रेयस हरणे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग 1 मधील आजची भव्य रॅली पाहता भाजपचा प्रचार प्रभावीपणे पुढे सरकत असून मतदानाच्या दिशेने पक्षाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.