Latest News

Latest News
Loading...

वणी नगर पालिका निवडणूक महासंग्राम: पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा, महिला नगराध्यक्ष व १५ महिला सदस्य नगर पालिकेला मिळणार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नगर पालिका निवडणुक अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील राजकारणाला ज्वर चढला आहे. राजकीय घडामोडी तीव्र झाल्या असून राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडविल्याने शहरातील वातावरण बदललं आहे. राजकीय वारे निवडणुकीच्या दिशेने वाहू लागल्याने शहरात राजकारणाचे ढग दाटले आहेत. शहरातील राजकारण अगदीच गडद झालं आहे. गुलाबी थंडीतही राजकारण तापलं आहे. २ डिसेंबरला वणी नगर पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची घमासान पाहायला मिळत आहे. प्रचार रॅली, कॉर्नर सभा व मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी दिल्या जात आहेत. मतांसाठी मतदारांना साकडे घातले जात आहे. जनाधार मिळविण्यासाठी पक्षांनी जोरदार प्रचार मोहीम आरंभली आहे. ७ नगराध्यक्ष तर १५२ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५२ पैकी २९ उमेदवार हे नगरसेवक म्हणून नगर पालिकेवर निवडून जाणार आहेत. 

भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांच्यात मुख्य लढत होत असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष देखील उमेदवारांच्या विजयाचं गणित बिघडवू शकतात. त्यामुळे मतविभाजनाचा फटका कुणाला बसतो व फायदा कुणाला होतो, हे निकालाअंती समोर येणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या घेणाऱ्यांमुळे राजकीय पक्षांच्या चिंता वाढल्या आहेत. अजूनही पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटत आहेत. पक्षांतर्गत असलेली नाराजी पक्षाच्या पतनाचे कारण ठरू नये, असाही सूर शहरात उमटू लागला आहे. 

असे असले पक्ष सध्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण शहर पिंजून काढत आहेत. पक्षांनी आपापल्या रणनीतीनुसार प्रचार मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे आता कोणता पक्ष मैदान गाजवतो, की निकाल संमिश्र लागतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच काही प्रभागात अपक्षही बाजी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली होती. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याकरिता महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गटाला तगडे डावपेच आखावे लागणार आहे. 

वणी नगर पालिका निवडणुकीच्या निघालेल्या आरक्षणात यावेळी महिलांचा वरचष्मा राहिला. चौदाही प्रभागात महिलांसाठी आरक्षण निघाल्याने नगर पालिकेवर यावेळी महिलाराज येणार आहे. त्यातल्यात्यात नगराध्यक्ष पदही अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने महिलांना नेतृत्व गाजविण्याची ही अनोखी संधी चालून आली आहे. पंधरा महिला नगरसेवक आणि एक महिला नगराध्यक्ष वणी नगर पालिकेला मिळणार असल्याने नगर पालिकेत नारीशक्तीचं दर्शन घडणार आहे. 

त्यामुळे लोप्रतिनिधी बनल्यानंतर महिला स्वतःला राजकारणात कशा सिद्ध करतात, निवडून आल्यानंतर स्वतः निर्णय घेतात, की पक्षाच्या दबावात राहतात किंवा महिलांच्या पदराआडून त्यांचे नवरेच राजकारण करतात, अशा वेगवेगळ्या चर्चा आता न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाकरिता महिलांना राजकारणातही मोठं आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे जनतेचं प्रतिनिधीत्व करतांना त्या जनभावनेचा कसा आदर करतात आणि जनतेला कशा प्रकारे न्याय देतात, यावर त्यांच्या राजकीय वाटचालीची भिस्त अवलंबून राहणार आहे. 

नगर पालिका निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झालं असून प्रशासनाने तशी तयारीही पूर्ण केली आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधाही असणार आहेत. मतदानासाठी ६२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. शहरातील ४९ हजार ५१७ मतदार ७ नगराध्यक्ष व १५२ नगरसेवक पदाच्या उमेदवाराचं भाग्य ठविणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.