नगर परिषद निवडणूक प्रचाराला वेग आला असून आज प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखविणारी जंगी प्रचार रॅली काढली. ढोल-ताशांच्या गजरात व घोषणांनी निनादलेल्या वातावरणात काढण्यात आलेल्या या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधले. या रॅलीच्या माध्यमातून भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यात आला.
प्रभाग २ मध्ये माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची आठवण करून देत भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधला. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात रस्ते, नाल्या, पथदिवे यांसारखी मूलभूत व पायाभूत कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली. भाजपच्या काळात शहरात झालेल्या विकासकामांची मतदारांना जाण असावी, ही अपेक्षा बाळगून भाजपने प्रचारात ‘विकास कार्ड’ पुढे ठेवले आहे.
भाजपच्या आजच्या प्रचारात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार रीता महेश पाहापळे व आशिष ज्ञानेश्वर डंबारे यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देण्यात आल्या.
भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार संपूर्ण टीम आज मैदानात उतरली होती. रॅलीला प्रभागातील नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “विकासासाठी भाजपा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.
प्रचाराच्या पुढील टप्प्यात उद्या २४ नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक १ मध्ये भव्य रॅली व घरघर संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रचारयात्रेचे नेतृत्व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी केले. यावेळी भाजपा नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जेष्ठ नेते खाडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा सचिव संतोष डंबारे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, तालुकाध्यक्ष (पूर्व) प्रदीप जेऊरकर, तालुकाध्यक्ष (पश्चिम) मीराताई पोतराजे यांचा समावेश होता.
भाजप कार्यकर्त्यांनी थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचून उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक २ मध्ये आजच्या जंगी प्रचारातून भाजपने निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.




No comments: