**भाजपचा प्रभागनिहाय झंझावाती प्रचार सुरू, प्रभाग ५ मध्ये भव्य रॅली — उमेदवारांना मतदारांचा मिळू लागला उत्स्फूर्त प्रतिसाद**
प्रशांत चंदनखेडे वणी :-
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पक्षाने प्रभागनिहाय झंझावाती प्रचार मोहीम राबवून राजकीय तापमान वाढवले आहे. 2016 मध्ये मिळालेल्या एकहाती सत्तेची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने भाजप पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून सर्व प्रभागांत उमेदवारांचा दमदार प्रचार सुरू आहे.
प्रत्येक प्रभागात प्रचार सभांबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यावर सोपवलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
शनिवारी (22 नोव्हेंबर) प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठी रॅली काढण्यात आली.
प्रभाग ५-अ मधून सोनाली प्रशांत निमकर व प्रभाग ५-ब मधून रितिक लक्ष्मण मामिडवार, तर नगराध्यक्ष पदासाठी विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये जंगी शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
रॅलीदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. प्रभागात ठिकठिकाणी नागरिकांकडून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. तर उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी त्यांचा उत्साह वाढविला. भाजप उमेदवारांच्या प्रचाराला प्रत्येकच प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही पक्षाने यावेळी सांगितले.
भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी स्वतः प्रभागनिहाय प्रचाराचे नेतृत्व करीत असून संपूर्ण मोहिमेचे नियोजन प्रत्यक्ष पाहणीसह राबविले जात आहे.
पक्षाच्या निवडणूक रणनीतीनुसार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत.
प्रचार रॅलीत भाजपा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, भाजपा वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस हरणे, भाजपा शहर उपाध्यक्ष विलास निमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
भाजपच्या या आक्रमक आणि नियोजित प्रचारामुळे नगरपालिका निवडणुकीत "सरळ-सामना" होणार असल्याची हवा निर्माण झाली आहे. विरोधकांच्या प्रचार यंत्रणेच्या तुलनेत भाजपची मोहीम अधिक गतीमान दिसत असल्याने निवडणूक मैदान अधिकच रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
तापलेले वातावरण, आक्रमक घोषणा आणि मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा सहभाग…
ही सर्व चिन्हे दाखवतात की वणी नगरपालिका निवडणुकीतील भाजपची मोहीम आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे.





No comments: