प्रशांत चंदनखेडे वणी :-
अवैध दारू विक्रेत्यांवर शिरपूर पोलिसांनी धाडसत्र अवलंबले आहे. शिरपूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार संतोष मनवर यांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या कुंडल्या शोधून त्यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारणे सुरु केले आहे. अवैध दारू विक्रेते सध्या शिरपूर पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याविरुद्ध धडक कार्यवाहीची मोहीम शिरपूर पोलिसांनी हाती घेतली आहे. २० नोव्हेंबरला शिंदोला परिसरात गस्त घालून पोलिसांनी दोन अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही केली. यात एका अवैध दारू विक्रेत्या महिलेचा समावेश आहे. अवैध दारू विक्रीत या दोघांचाही मोठा हातकंडा असल्याचे समजते. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांवर शिरपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संतोष मनवर यांना मिळाली. शिरपूर हद्दीत अवैध दारूचा महापूर वाहत असल्याच्या माहितीवरून ठाणेदार संतोष मनवर यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे. शिरपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाहीचा सपाटा लावल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शिंदोला बसस्थानकामागे नवीन वस्तीत राहणारी संगिता दिलीप टोंगे ही महिला शिंदोला बसस्थानकाजवळ अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी सापळा रचून या महिलेला अवैध दारू विक्री करतांना रंगेहात पकडले. या महिलेच्या घरातून पोलिसांनी देशी दारूच्या ९० मिलीच्या ४६ आणि १८० मिलीच्या ८ शिष्या जप्त केल्या. देशी किंवा विदेशी दारू विक्रीचा कुठलाही परवाना नसतांना संगिता टोंगे (३८) ही महिला अवैधरित्या दारू विक्री करीत होती. पोलिसांनी तिच्यावर मदाकाच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिंदोला परिसरातील दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी प्रविण विलास पुल्लेवार (२५) याला अवैधरित्या दारू विक्री करतांना सापळा रचून ताब्यात घेतले. शिंदोला बसस्थानकाजवळ पांढऱ्या रंगाच्या थैलीत देशी दारूच्या शिष्या भरून तो देशी दारूची अवैध विक्री करतांना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ९० मिलीच्या २४ देशी दारूच्या शिष्या असा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू विक्री करतांना रंगेहात सापडलेल्या प्रविण पुल्लेवार या आरोपीवर पोलिसांनी मदकाच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संतोष मनवर यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरु केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलाच थरकाप उडाला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेत असतांना पोलिस मात्र सतर्कता बाळगून असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.

No comments: