Latest News

Latest News
Loading...

प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जागर, प्रेस वेल्फेअर तर्फे आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेला व्यासपीठ मिळावे, या उदात्त हेतूने आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शहरातील एस.पी.एम. हायस्कूलच्या रंगमंचावर ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कला, सृजनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत व्हावी, तसेच त्यांना आपली प्रतिभा समाजासमोर सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटांत घेण्यात येणार असून, प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, खासदार प्रतीभा धानोरकर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील उत्कृष्ट नृत्य सादरीकरणासाठी प्रेस वेल्फेअर असोसिएशनकडून ‘बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक’ प्रदान करण्यात येणार असून, त्यामुळे स्पर्धेत चैतन्य व स्पर्धात्मकता अधिक वाढणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचे भव्य, नियोजनबद्ध व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या कला-सांस्कृतिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम वणी शहराच्या सांस्कृतिक परंपरेला नवी दिशा देणारा ठरत आहे. या स्पर्धेत शहरातील अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा संयोजक विनोद ताजने, तसेच प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिलोरिया व सचिव सागर बोढे यांनी केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाला सांस्कृतिक रंगत देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

No comments:

Powered by Blogger.