Latest News

Latest News
Loading...

शाळेत उमलला आनंदाचा उत्सव; माता-पालक मेळाव्याने दिला जगण्याला नवा अर्थ

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि संसाराच्या ओझ्यात आयुष्य जगत असताना अनेक क्षण नकळत निसटून जातात. हसणं, आनंद व्यक्त करणं, मनमोकळं होणं हे जणू विसरूनच गेल्यासारखं होतं. मात्र श्री. संत गाडगेबाबा नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. ६, वणी येथे २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या माता-पालक मेळाव्याने अनेक मातांच्या आयुष्यात एका आनंदी पर्वाची भर घातली.

या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीच्या लेकींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून केली. त्यानंतर रंगलेला हा मेळावा केवळ एक शालेय उपक्रम न राहता मातांसाठी आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि मनोमोकळेपणाचा उत्सव ठरला.

शाळेच्या वतीने माता-पालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या मातांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. घर-काम, संसार आणि जबाबदाऱ्यांच्या चौकटीत अडकलेल्या या मातांनी एक दिवस तरी त्या चौकटी तोडून मनसोक्त जगण्याचा अनुभव घेतला. निःसंकोचपणे हसत, नाचत, आपले कलागुण सादर करत त्यांनी आनंदाला वाट मोकळी करून दिली.

स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या मातांना आनंदाची भेट म्हणून बक्षिसे देण्यात आली. विजेत्या मातांना बक्षीस वितरण करण्यात आले. परंतु या मेळाव्याचं खऱ्या अर्थाने मिळालेलं बक्षीस म्हणजे — मनाचा आनंद, आत्मसन्मान आणि एक दिवस भरभरून जगल्याचं समाधान. महिला शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत माता-पालकांचा आनंद द्विगुणित केला.

घर, संसार, कर्तव्य आणि काळजी… या चौकटीत अडकलेलं स्त्रीचं आयुष्य अनेकदा स्वतःसाठी जगायचं विसरून जातं. दिवसा मागून दिवस निघून जातात, पण मनाच्या कप्प्यात दडलेला आनंद मात्र अनभिज्ञच राहतो. आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री वर्गासाठी असे क्षण विरळच. चिंता, काळजी, नैराश्य यांना काही काळ विसरून आनंदाच्या ओघात वाहून जाण्याची संधी या मेळाव्याने दिली. अनेक मातांसाठी हे क्षण न जगलेले, न अनुभवलेले होते — जे एक दिवस का होईना, पण भरभरून जगता आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पालकांच्या मानसिक स्वास्थ्याचीही जबाबदारी शाळेने ओळखून हा उपक्रम राबविला. त्यामुळे शिक्षकवृंदाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता समाजातील स्त्रीच्या मनोधैर्याला बळ देणारे केंद्र ठरू शकते, याचेच हे जिवंत उदाहरण ठरले.

No comments:

Powered by Blogger.