प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबातील एकुलत्या एका मुलाने तारुण्याच्या उंबरठ्यावर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने जनमानसांत हळहळ व्यक्त होत आहे. कुंदन बबन आत्राम (१७) रा. पिसगाव ता. मारेगाव असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्मघात केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे आत्राम कुटुंब वास्तव्यास आहे. रोज मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना कुंदन हा एकुलता एक मुलगा होता. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात ११ वित शिक्षण घेत होता. मात्र शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या वयात त्याने आत्महत्या केली. नेमक्या कुठल्या मानसिक तणावातून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आई वडील मजुरी करून घरी परतल्यानंतर कुंदन हा घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आणि आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. आई वडिलांच्या जोरजोरात रडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नंतर गावातीलच काही नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. एकुलत्या एका मुलाच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे. कुटुंबाचा आधार बनण्याच्या वयात मुलाने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. उमेदीच्या वयात तरुण मुलं आत्महत्या करू लागल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कुंदनच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस त्याच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

No comments: