पोलीस अधीक्षकांकडून वणी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण; दरोड्यातील १२.५२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीला परत, नागरिकांना हेल्मेट वाटप
प्रशांत चंदनखेडे वणी :-
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गुरुवारी (दि. ८) वणी पोलीस ठाण्याचे सन २०२५-२६ या वर्षाचे वार्षिक निरीक्षण केले. या निरीक्षणादरम्यान पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. यासोबतच दरोड्याच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी पोलीस दलाच्या वतीने शिस्तबद्ध मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. ठाण्यातील सर्व रेकॉर्ड अद्ययावत असल्याबाबत पोलीस अधीक्षकांनी समाधान व्यक्त केले.
व्यापारी व पोलीस पाटीलांशी संवाद
यावेळी वणी शहरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस विभागाने बजावलेल्या भूमिकेचे व्यापाऱ्यांनी कौतुक केले. तसेच ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस पाटीलांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरोड्याचा मुद्देमाल फिर्यादीला परत
दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावून हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदाराला परत करणे, हे या निरीक्षणाचे विशेष आकर्षण ठरले. वणी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अपराध क्रमांक ७३५/२०२५ मधील तब्बल १२ लाख ५२ हजार ८३५ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल मूळ फिर्यादी संजय निळकंठराव कोंडावार (रा. वणी) यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला. मुद्देमाल मिळाल्याने फिर्यादीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
पोलीस वर्धापन दिनानिमित्त हेल्मेट वाटप
महाराष्ट्र पोलीस ‘रेझिंग डे’ सप्ताहाचे औचित्य साधून रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गुन्हे आढावा व वृंद परिषद
प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून पोलीस अधीक्षकांनी प्रलंबित गुन्हे, दोषारोपपत्रांची स्थिती व गुन्हेगारी नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांची ‘वृंद परिषद’ घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या वार्षिक निरीक्षणामुळे वणी पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झाले असून, ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षकांनी भविष्यात अधिक परिणामकारक व लोकाभिमुख कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.

No comments: