प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास चालढकल करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करतांनाच जिल्हा वार्षिक योजनेतील जनसुविधा निधी देतांना वणी तालुक्याला डावलण्यात आल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणी तालुक्याच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांचा भार येत असून अध्यापनाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मंजूर असलेली रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत, अशी ठाम मागणी सरपंच संघटनेने केली आहे.
१५ दिवसांच्या आत शिक्षकांची पदे भरली नाहीत, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा एक दिवस बंद ठेवण्यात येतील, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, वणी तालुक्यातील एकूण १०१ ग्रामपंचायतींसाठी पंचायत समिती स्तरावरून विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असतानाही, जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा) आर्थिक वर्ष २०२४-२५ चा निधी देताना वणी तालुक्याला वगळण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निधीअभावी तालुक्याच्या विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करत, तात्काळ जनसुविधा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरपंच संघटनेकडून करण्यात आलेल्या या दोन्ही मागण्यांची निवेदने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणी तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. ही दोन्ही निवेदने सादर करतांना अध्यक्ष प्रवीण झाडे, सचिव गिता उपरे, उपाध्यक्ष नागेश धनकसार, उपसरपंच श्याम धुळे-तराळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण व विकास या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून, आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments: