वणीतील तंबाखू तस्करी प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय; तपास अधिकाऱ्याच्या निलंबनाची युवासेनेची मागणी
शहरातील पंचशील नगर परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात वणी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणातील दोषी तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून आरोपी व वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करत पोलिसांच्या तपासातील दिरंगाईवर बोट ठेवले आहे. ८ डिसेंबर रोजी जागरूक नागरिकांनी ‘११२’ क्रमांकावर दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचशील नगर येथे सुगंधित तंबाखूची मोठी खेप पकडली होती. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पंचनामा केल्यानंतर वणी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर कलमान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
१० दिवस उलटूनही वाहन जप्त नाही
तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन (क्रमांक MH-24-BL-7051), त्याचा चालक व मालक यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे उपलब्ध असताना, सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्ष साक्षीदार असूनही १० दिवस उलटून वाहन जप्त न करण्यात आल्याने संशय अधिक बळावला आहे. वाहन जप्त न केल्यामुळे तस्करीमागील आर्थिक साखळी व मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास अडथळा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांचे तंबाखू माफियांशी संगनमत?
या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असून, जाणीवपूर्वक दिरंगाई करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे बेकायदेशीर तंबाखू तस्करीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
युवासेनेच्या ठाम मागण्या
युवासेनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये तस्करीसाठी वापरलेले वाहन MH-24-BL-7051 तात्काळ जप्त करून मालक व चालकावर कठोर कारवाई करावी, अन्न व औषध प्रशासनाकडून नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करावी, तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
४८ तासांत कारवाई नाही तर आंदोलनाचा इशारा
जर येत्या ४८ तासांत या प्रकरणात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

No comments: