Latest News

Latest News
Loading...

राजीनाम्यांमागे विरोधकांचे षडयंत्र; ग्रामविकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न – उपसरपंच सुनील कातकडे

प्रशांत चंदनखेडे वणी :-

ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर चिखलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील कातकडे यांनी वृत्त माध्यमांसाठी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण दिले. वृत्त माध्यमांसाठी काढण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक हे संपूर्णपणे स्पष्टीकरण देण्यासाठीच होते, असे स्पष्ट करत उपसरपंच सुनील कातकडे यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

ते म्हणाले की, २०२२ मध्ये आम्ही सर्व सदस्य एकाच पक्षाचे, एकाच विचाराचे आणि एकाच झेंड्याखाली एकत्र येत गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलो. आरक्षणानुसार सर्व विचाराअंती पदांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार रुपालीताई कातकडे यांची सरपंचपदी निवड झाली, तर मी स्वतः उपसरपंच आहे. पंकज मोरे यांची शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी व शिवमंदिर देवस्थान अध्यक्षपदी, शिवराज दुमणे यांची कृषी समिती अध्यक्षपदी, तर वनिताताई सिडाम यांची पांदण रस्ता समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांपासून सर्व सदस्यांनी एकत्रितपणे ग्रामविकासासाठी काम केले आहे. गाव मोठे असल्याने विविध समस्या उद्भवत असतात. त्या समस्या मासिक सभा, ग्रामसभा व सहविचार सभांच्या माध्यमातून चर्चेला घेतल्या जात होत्या व मार्ग काढला जात होता. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यालाच नेहमी प्राधान्य देण्यात आले, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले.

काम करत असताना मतभेद होणे स्वाभाविक असल्याचे स्पष्ट करीत कातकडे म्हणाले की, गावात सहा मोठे वॉर्ड असून १८ सदस्यांची कार्यकारणी आहे. प्रत्येक प्रतिनिधीला आपला वॉर्ड आधी विकसित व्हावा असे वाटणे साहजिक आहे. मात्र निधीची मर्यादा व मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल साधावा लागतो. या मतभेदांचाच गैरफायदा घेत विरोधकांनी काही सदस्यांवर दबाव टाकून राजीनामे घडवून आणले असून ग्रामविकासाच्या कामाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

कालपर्यंत आम्ही एक होतो, आजही एक आहोत आणि उद्याही एकत्रच राहणार आहोत. विरोधकांनी रचलेले षडयंत्र आम्ही हाणून पाडू. सर्व सदस्यांना एकत्र बसवून मतभेद दूर करत ग्रामविकासाचे काम सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विरोधकांनाही थेट आवाहन करत सांगितले की, ग्रामपंचायतीत दुफळी निर्माण करण्याऐवजी त्यांनी आमच्यासोबत येऊन गावाच्या विकासासाठी हातभार लावावा. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही केवळ सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांचीच नव्हे, तर विरोधकांचीही सामूहिक जबाबदारी आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे लोकशाही पद्धतीने, सर्वानुमते व पारदर्शक सुरू असून भविष्यातही लोकहिताची कामे कोणताही अडथळा न आणता सुरू राहावीत, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असल्याचा व विकासकामांत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आठ सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. मात्र या प्रत्येक आरोपाचे सविस्तर स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकातून देत उपसरपंच सुनील कातकडे यांनी ते बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचे काम सुरळीत सुरू असताना जाणीवपूर्वक त्यात अडथळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Powered by Blogger.