Latest News

Latest News
Loading...

सावर्ला–कोणा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; ग्रामीण विकासाला नवी दिशा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील सावर्ला ते कोणा या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना २०२५-२६ अंतर्गत या महत्त्वपूर्ण मार्गाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा क्षण ठरला.

या कामाच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून ग्रामीण रस्ते विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्याने या प्रकल्पाला गती मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
सावर्ला–कोणा मार्ग हा स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पक्का व दर्जेदार रस्ता उभारला जाणार असल्याने शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा व दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

याप्रसंगी बोलतांना संजय देरकर म्हणाले की, “दिलेला शब्द मी पाळतोय, प्रगतीची गंगा घराघरात पोहोचविण्याचा माझा निरंतर प्रयत्न राहणार आहे,” तसेच विकासकामांना चालना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचाही त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर देत मतदारसंघात सातत्याने निधी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत रस्त्याचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, ग्रामीण भागातील संपर्क मार्गांच्या उभारणीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असून विकासाच्या प्रक्रियेला नवी गती मिळेल, असे चित्र आहे.

No comments:

Powered by Blogger.