प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत उकणी-बेलसनी परिसरातील शेतकऱ्यांनी वर्धा नदीजवळील वेकोलिच्या चेक पोस्टवर कोळसा वाहतूक रोखून धरत चक्काजाम आंदोलन छेडले. मौजा बेलोरा गावालगत झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ कोळसा वाहतूक ठप्प झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती, उकणी/बेलसनी (ता. वणी, जि. यवतमाळ) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. उकणी खंड-१ मधील उर्वरित जमीन संपादन आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी देण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत Western Coalfields Limited (वेकोलि) प्रशासनाने तातडीने चर्चेची भूमिका स्वीकारली. निलजई प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर शेतकरी प्रतिनिधींना अधिकृत लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानुसार उकणी खंड-१ मधील उर्वरित जमीन संपादनाचा प्रस्ताव तसेच प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबतचा विषय पुढील एका महिन्याच्या आत वेकोलि मुख्यालय, नागपूर येथे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी हमी मिळाल्यानंतर संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
उकणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय खाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात समितीचे अध्यक्ष सुरेश धपकस, कार्याध्यक्ष अमोल विठ्ठल पुरडकर, उपाध्यक्ष पराग मनोहर तुरानकार यांच्यासह शामसुंदर जुनारकर, सचिन लोडे, घनश्याम खाडे, सुरेश धपकस, चंद्रकांत जीवतोडे, पद्माकर झाडे, महेश पाटील, विकास लालसरे, संतोष धांडे, किसन पारशिवे, अॅड. सूरज महातळे, संजय बांदुरकर यांच्यासह उकणी व बेलसनी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष न दिल्यास स्थानिक पातळीवरील असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता वेकोलि प्रशासन दिलेल्या आश्वासनाची कितपत पूर्तता करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments: