Latest News

Latest News
Loading...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी शहर समन्वयकपदी मोरेश्वर उज्ज्वलकर यांची नियुक्ती


प्रशांत चंदनखेडे वणी :-

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे सातत्याने चर्चेत राहणारे मोरेश्वर उज्ज्वलकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वणी शहर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्याशी चर्चा करून मोरेश्वर उज्ज्वलकर यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती निश्चित केली. अनुभवी व प्रभावी नेतृत्वाला शहर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मोरेश्वर उज्ज्वलकर यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष विस्तार व संघटन बांधणी यावर विशेष भर दिला होता. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध उपक्रम राबवून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. गरजूंना मदत, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांना मात्तबर राजकारणी म्हणूनही ओळख मिळाली आहे. तसेच ते यशस्वी व्यावसायिक म्हणूनही सर्वांना परिचित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील जबाबदारी पार पाडल्यानंतर मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्वप्नपूर्ती सोहळ्यात त्यांनी शिवबंधन बांधून घेतले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर शहर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला बळ मिळणार असून पक्षाच्या विस्ताराला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेत प्रवेशानंतर त्यांचा राजकारणातील अनुभव लक्षात घेता अल्पावधीतच त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी शहर समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली असून शहर पातळीवर संघटन बळकट करणे, प्रभागनिहाय बैठका, सदस्य नोंदणी मोहीम आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, या बाबींवर ते लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.

शिवसेना शहर अध्यक्ष विनोद ढुमणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी पूर्वीच्या कार्यकाळात संघटन मजबुतीसाठी निष्ठेने काम केले. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितच लाभ होईल. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
आपल्या नियुक्तीबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी पक्षप्रमुख व स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. “व्यक्ती पदामुळे नाही, तर कर्तृत्वामुळे मोठा होतो. कोणतेही पद असो, त्या पदाला न्याय देणे महत्त्वाचे आहे,” असे नम्र उद्गार त्यांनी यावेळी काढले.

त्यांच्या नियुक्तीमुळे वणी शहरात शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना नवसंजीवनी मिळणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे.

No comments:

Powered by Blogger.