वणीत वाढती गुन्हेगारी; सलग खुनांच्या घटनांनी शहर हादरले! चार-पाच महिन्यांत चार ते पाच खून; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
शांत आणि कष्टकरी शहर म्हणून ओळख असलेल्या वणीत मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः चार ते पाच खुनांच्या सलग घटनांनी शहरवासीयांची झोप उडाली असून कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मागील काही महिन्यांत किरकोळ कारणांवरून वाद वाढत जाऊन त्याचे थेट खुनात रूपांतर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पैशांचे व्यवहार, वैयक्तिक वाद, जुन्या वैरातून घडलेल्या घटना आणि क्षुल्लक कारणांवरून झालेले जीवघेणे हल्ले यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती किती आक्रमक होत चालली आहे, हे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे बहुतांश घटनांमध्ये आरोपी आणि मृत व्यक्ती एकमेकांचे परिचित, मित्र किंवा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समाजातील नातेसंबंधांमध्ये वाढती असहिष्णुता आणि हिंसक मानसिकता अधोरेखित होत आहे.
शहरातील प्रमुख चौक, वार्ड, मोहल्ले व वर्दळीची ठिकाणे तसेच ग्रामीण भागातही मारामाऱ्या, शस्त्रांचा वापर आणि टोळक्यांची दहशत वाढल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर पडण्यास कचरू लागले असून व्यापारी वर्गही अस्वस्थ आहे. पालकांमध्ये तरुण पिढीच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कायद्याचा धाक कमी होत चालल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, संशयितांवर कडक नजर ठेवावी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
लालगुडा (नवीन) येथील भंगार गोळा करणाऱ्या इसमाचा झालेला खून, गणेशपूर येथील दोन युवकांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा केलेला खून, शहरातून एका वृद्धाचे अपहरण करून त्याचा बेलोरा फाट्यावर नेऊन केलेला खून, वागदरा (नवीन) येथील युवकाचा खून करून मृतदेहाची जीएस ऑइल मिल कंपनीतील पाण्याच्या टाक्यात विल्हेवाट लावण्याचा झालेला प्रयत्न, रंगनाथ नगर येथील युवकाचा वडगाव टीप रोडवरील गजानन नगरी परिसरात धारदार शस्त्राने केलेला खून आणि आता दामले नगर येथील तरुणाचा भरवस्तीत डोक्यावर सळाखीने वार करून केलेला खून, या सलग घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
वाढत्या गुन्हेगारीमुळे वणी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा शांत शहराची ओळख असलेले वणी गुन्हेगारीच्या छायेत कायमचे अडकण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

No comments: