वणी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाजबांधव तसेच शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिवादन, पुष्पहार अर्पण, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शिवचरित्राचा जागर करण्यात आला.
🔺 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विचारमंथनात्मक कार्यक्रम
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी छत्रपतींच्या लोकाभिमुख राज्यकारभाराचा उल्लेख करताना सांगितले की, “लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आज लोकशाहीत राहूनही एका राजाची जयंती एवढ्या उत्साहाने साजरी होते, यावरून त्यांच्या कार्याची महानता स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये, असा आदेश देणारे शिवाजी महाराज हे खरे कष्टकऱ्यांचे राजे होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. किसन मोहुर्ले होते. तर कॉ. प्रीती करमणकर, तालुका सचिव कॉ. गजानन ताकसांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विचार मांडले. प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
🔺 वणी पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम
वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य सतीश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. जेष्ठ शिक्षक मंगल तेलंग यांनी छत्रपतींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांनीही शिवचरित्रावरील आपापली मनोगते व्यक्त केली.
🔺 शहरात ठिकठिकाणी अभिवादन
शहरातील विविध मंडळे, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका, घोषणाबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
🔻 एकत्रित संदेश
विविध विचारधारा, संघटना आणि समाजघटक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत असल्याचे चित्र वणीत पाहायला मिळाले. छत्रपतींच्या शौर्य, न्यायनिष्ठा आणि लोकाभिमुख राज्यकारभाराच्या स्मृतींना उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.

No comments: