मुकूटबन परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असतानाच पोलिसांनी सलग दोन दिवसांत केलेल्या धडक कारवाईने कायदा मोडणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले, तर दुसऱ्या कारवाईत गोवंश तस्करी करणारे वाहन पकडून तीन जनावरांची सुटका करण्यात आली.
दि. १९ फेब्रुवारी रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ताठे यांना मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मुकूटबन येथील एका मटका अड्ड्यावर छापा टाकला. मटक्यावर अचानक धाड पडताच मटका जुगार खेळणाऱ्यांमध्ये पळापळ सुरु झाली. वरळी मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळणारे पोलिसांची चाहूल लागताच सैरावैरा पळत सुटले.
या वेळी मटका पट्टी फाडणारा अब्दुल रज्जाक शेख मुखत्यार (रा. मुकूटबन) हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याजवळून वरळी मटका साहित्य व रोख १ हजार ४२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याआधी दि. १८ फेब्रुवारी रोजी गोवंश तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी टीएस-१६-यूडी-२८३२ क्रमांकाचे मॅक्झीमा वाहन अडवून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या तस्कराला ताब्यात घेऊन वाहनात निर्दयीपणे कोंबून नेत असलेल्या तीन गोवंशांची सुटका केली. या धडक कारवाईत सुमारे १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार सतीश जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रविण हिरे, पो.हे.कॉ. दीपक ताठे, विनोद नागरगोजे, रवि इसनकर, बादल जाधव, निहाल राठोड व सहकाऱ्यांनी पार पाडल्या.
मुकूटबन परिसरात अवैध धंद्यांना मुळासकट उखडून टाकण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

No comments: