वणीत रेतीचा काळाबाजार बोकाळला; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह! दुप्पट दराने विक्री, घरकुल लाभार्थी हवालदिल
प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले असून प्रशासनाच्या मूक संमतीनेच हा गोरखधंदा फोफावला असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. सर्वसामान्यांना बांधकामासाठी शासनदरात रेती मिळणे दुरापास्त झाले असून काळ्याबाजारात दुप्पट किमतीने रेती विकली जात आहे. परिणामी घराचे स्वप्न साकार करण्यासाठी झटणाऱ्या आणि दाम दुप्पट किंमतीने रेती खरेदी करावी लागणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे.
घरकुल योजनेचे लाभार्थीही रेतीअभावी अडचणीत सापडले आहेत. शासनाने घरकुल बांधकामासाठी रेती पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना रेतीसाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत रखडली असून त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.
तालुक्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे. घाट बंद असतानाही शहरात ठिकठिकाणी रेतीचे साठे दिसून येतात. बांधकामस्थळी मुबलक रेती उपलब्ध असते, मात्र ती शासनदरात नसून काळ्याबाजारातून आणलेली असल्याचे उघड गुपित आहे.
हायवा टिप्परमधून रेतीची उघडपणे वाहतूक होत असतानाही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. एखाद-दुसरी कारवाई करून नंतर पुन्हा तस्करांना मोकळे रान दिले जाते, असा आरोप नागरिक करीत आहेत. “आम्ही कारवाई केल्यासारखे करतो, तुम्ही घाबरलात असे दाखवा,” असा दिखाऊ प्रकार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
हर्रास पद्धतीने लिलाव झालेल्या रेती घाटातूनही चोरी सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ज्या घटातून शासनदरात रेती मिळायला हवी, त्याच घटातून दुप्पट दराने काळ्याबाजारात रेती विक्री होत असल्याचा आरोप आहे. तस्करीत पारंगत असलेल्या घटकांनाच घाट मिळाल्याने विविध शक्कली लढवून नियमांना बगल दिली जात असल्याचे बोलले जाते.
या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून तस्कर मात्र गब्बर झाले आहेत. त्यांचे कथित पाठीराखेही मालामाल होत असल्याची चर्चा आहे. मात्र कष्टाचा पैसा खर्च करून घर बांधणारा सर्वसामान्य नागरिकच यात भरडला जात आहे.
वाढत्या तक्रारी, राजकीय व सामाजिक स्तरावरून दिलेल्या निवेदनांनंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रेती तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर मोहीम राबवावी, हर्रास घाटांवर पारदर्शक यंत्रणा उभी करावी आणि घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
रेतीच्या काळाबाजारामुळे वणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर बांधणे व घराची कामे करणे कठीण झाले असून प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज अधोरेखित होत आहे.
त्यामुळे वणीतील रेतीचा काळाबाजार थांबवायचा की त्याला मूक संमती द्यायची, हा निर्णय आता प्रशासनालाच घ्यावा लागणार आहे. अन्यथा जनतेचा रोष रस्त्यावर उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

No comments: