Latest News

Latest News
Loading...

‘ऑल आऊट’ मोहिमेत एलसीबी पथकाच्या दोन धडाकेबाज कारवाया! अवैध शस्त्रसाठा जप्त; दरोडा प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत वणी शहरातून अवैध शस्त्रसाठा जप्त केला, तर दुसऱ्या कारवाईत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली. या दुहेरी कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला स्पष्ट इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिल्यानंतर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पांढरकवडा–वणी उपविभागीय पथकाने २७ फेब्रुवारी रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे माळीपुरा परिसरात धाड टाकली.

सहा धारदार अवजारे जप्त

माळीपुरा येथील निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (वय २२) हा भविष्यात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात अवैधरीत्या शस्त्रे साठवून ठेवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष घरझडती घेतली असता घरात तलवारी, चाकू व कुकरी अशी एकूण सहा धारदार अवजारे (अंदाजे किंमत १४ हजार रुपये) आढळून आली. आरोपीने बेकायदेशीरपणे घरात साठवून ठेवलेली शस्त्रे पथकाने जप्त केली आहे.

या प्रकरणी आरोपीवर आर्म अॅक्टच्या कलम ४/२५ सह संबंधित कलमान्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडून शस्त्रांचा वापर करून संभाव्य गुन्ह्याची तयारी सुरु असल्याचे गुपित उघड झाले आहे. 

दरोडा प्रकरणातील आरोपी अटकेत

दरम्यान, वणी येथील कोंडावार ज्वेलर्स दरोडा प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आणि गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेला अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (वय २६, रा. यवतमाळ) याला यवतमाळ शहरातून ताब्यात घेण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीस पुढील चौकशीसाठी वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके,पोहवा सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदूरकर व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी अधिक सजग भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत असून, या कारवाईने वणी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Powered by Blogger.