प्रशांत चंदनखेडे वणी :-
अनेक वर्षे पक्षासाठी जीव ओतून काम केलेल्या युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने वणीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्त्याच्या या निर्णयामागे पक्षांतर्गत घुसमट, उपेक्षा आणि स्थानिक नेतृत्वाबद्दलची नाराजी कारणीभूत असल्याचे त्याच्या राजीनाम्यातून स्पष्ट होते.
शिवसेना (उबाठा) प्रणित युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविल्याचा उल्लेख शेंडे यांनी केला आहे. कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, शहरात औषध फवारणी, युवक-विद्यार्थ्यांशी संपर्क मोहिम, गरजूंना शासकीय कागदपत्रांसाठी मदत, विविध जयंती-उत्सवांनिमित्त सामाजिक उपक्रम — या सर्व कामांमधून त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
‘सामना’ या पक्षाच्या अधिकृत मुखपत्रातून चार वेळा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती मिळाल्याचा उल्लेख करत, तो आपल्या कार्याचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, अलीकडील काळात महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया आणि नगरपरिषद सीट वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. संघटनात्मक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
“पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही विश्वासात घेतले जात नाही, ही वेदना असह्य झाली. त्यामुळे स्वाभिमान जपत हा निर्णय घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष आणि नेतृत्वाबद्दल मनात आदर कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एका मागोमाग कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा असून, स्थानिक नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अजिंक्य शेंडे यांच्या राजीनाम्यामुळे युवासेनेतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.

No comments: