Latest News

Latest News
Loading...

दुमजली इमारतीत सुरु होता बनावट देशी दारूचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाच्या धडाकेबाज कारवाईने केला पर्दाफाश


प्रशांत चंदनखेडे वणी :- 

शहराच्या उंबरठ्यावरच बनावट देशी दारूचा कारखाना बिनधास्त सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईतून उघड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी दुपारी टाकलेल्या नियोजनबद्ध धाडीत बनावट देशी दारूचा मोठा साठा तसेच कच्चा माल आणि वाहने असा एकूण २ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र बनावट देशी दारूचा कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधार धाड पडण्यापूर्वीच कुटुंबासह फरार झाला.

शहरालगत असलेल्या लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळ एका दुमजली इमारतीत बनावट देशी दारू तयार करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या इमारतीत बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखानाच असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. येथे तयार होणारी बनावट देशी दारू शहर व आसपासच्या परिसरात अवैध विक्रीसाठी पुरविली जात असल्याच्या गुप्त माहिती वरून उत्पादन शुल्क विभागाचे पथक मागील काही दिवसांपासून या इमारतीवर पाळत ठेऊन होते. 

दरम्यान येथील हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने या दुमजली इमारतीवर अचानक छापा टाकला. झडतीदरम्यान घरातील लाकडी दिवाण व आलमारीत ‘रूपेश संत्रा’ ब्रँडचे बनावट स्टिकर लावून तयार ठेवलेल्या ९० मिली क्षमतेच्या ३६ प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेल्या तब्बल ३६०० शिश्या आढळून आल्या. या बनावट दारूची किंमत सुमारे १ लाख ६२ हजार रुपये असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

घराला लागून असलेल्या टिनाच्या शेडमध्ये रिकाम्या काचेच्या बाटल्या, झाकण, प्लास्टिक ड्रम, पॅकिंग साहित्य तसेच दोन दुचाकी आणि एक मोपेड आढळून आली. पथकाने हे सर्व साहित्य व दुचाकी वाहने देखील जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बनावट दारू तयार करून ती शहर व परिसरात पुरवली जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान लाकडी दिवाणात लपून बसलेल्या सूरज लोडे (रा. वेळाबाई) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा कारखाना श्याम भरत मेश्राम याचा असल्याची माहिती दिली. मात्र धाड पडण्यापूर्वीच मेश्राम हा कुटुंबासह पसार झाल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पी. एस. बोढारे (पांढरकवडा), भरारी पथक प्रभारी निरीक्षक डी. एस. त्रिपाठी, उपनिरीक्षक एस. एल. बोढेवार, एस. एम. बुटले तसेच यवतमाळ येथील उपनिरीक्षक डी. डी. वाळके व सहकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

बातमी लिहेपर्यंत पुढील तपास व कारवाई सुरू होती. फरार मुख्य आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरालगतच असा अवैध कारखाना सुरू असल्याचे उघड झाल्याने प्रशासकीय यंत्रणेतही मोठी खळबळ माजली आहे. 

No comments:

Powered by Blogger.