प्रशांत चंदनखेडे वणी :-
वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वणी येथे आज २५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने वनजमीन कसणारे आदिवासी व पारंपरिक वननिवासी सहभागी होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वनजमीन कसत आहेत; मात्र २००६ मध्ये लागू झालेल्या वनाधिकार कायद्यानंतरही त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडे दावे दाखल करूनही प्रकरणे प्रलंबित राहिल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
राज्यात काढण्यात आलेल्या लाँग मार्चदरम्यान शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. “दावे दाखल केलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास जमिनीचा पट्टा मिळालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी या आंदोलनातून करण्यात येणार असून वनजमिनी कसणाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र धरणे देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
आंदोलनादरम्यान वनजमीन कसणाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना वैयक्तिक अर्ज सादर करण्यात येणार असून, प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
वनहक्कांसाठी होणाऱ्या या धरणे आंदोलनात वनजमीन कसणाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
वनाधिकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, २५ फेब्रुवारीचे आंदोलन प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

No comments: